तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनाबद्दल देशभरात शोक व्यक्त केला जात असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीदेखील आपल्या लेकीच्या लग्नाचा स्वागतसमारंभ साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. नितीन गडकरी यांची कन्या केतकी हिचा विवाह रविवारी नागपुरात पार पडला होता. त्यानंतर आज नागपूरमध्येच लग्नाचे रिसेप्शन आयोजित करण्यात आले होते. सध्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असल्यामुळे अनेक पक्षांचे राजकीय नेते नागपूरात उपस्थित आहेत. नितीन गडकरी यांचे सर्वपक्षीयांशी असलेले संबंध पाहता आजच्या स्वागतसमारंभाच्या सोहळ्याला मोठी गर्दी होण्याचा अंदाज होता. मात्र, जयललिता यांच्या निधनाच्या वार्तेने हा उत्साह काहीप्रमाणात मावळला आहे. केवळ पत्रिका वाटलेली असल्यामुळे स्वागत समारंभ रद्द करता येत नाही. पण जयललिता यांच्या निधनामुळे कोणतीही सजावट करणार नाही आणि गोड पदार्थही अभ्यागतांना देण्यात येणार नाही, असे गडकरी यांनी मंगळवारी सकाळी स्पष्ट केले.

गेल्या काही दिवसांपासून शाही थाटात पार पडलेल्या गडकरींच्या कन्येच्या लग्नाची चर्चा चांगलीच रंगली आहे. विवाहानिमित ठिकठिकाणी आयोजित भोजनावळींची चर्चा राजकीय वर्तुळात सर्वदूर आहे. या सोहळ्याच्या काही दिवस आधीपासून सुरू झालेल्या आणि आणखी दोन ठिकाणी आयोजित या भोजनावळीत सुमारे ४५ ते ५० हजार लोकांची व्यवस्था करण्यात आल्याचे सांगण्यात येत होते. गडकरी यांच्या मुलीचा विवाह रविवारी नागपुरात झाला, परंतु या समारंभापूर्वी आणि त्यानंतरही दोन ठिकाणी भोजनाची व्यवस्था करण्यात आली. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर सर्वप्रथम २७ नोव्हेंबरला झालेल्या भोजनावळीत सुमारे १० हजार लोकांनी जेवण केले. त्यानंतर ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांसाठी धापेवाडा येथे भोजनवळ झाली. तेथेही सुमारे १० ते १२ हजार लोकांची उपस्थिती होती. ४ डिसेंबरला पार पडलेल्या या विवाह सोहळ्याला जवळचे नातेवाईक आणि अतिविशिष्ट व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले होते. येथे सुमारे दोन हजार लोकांनी हजेरी लावली. त्यानंतर आज ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर आमदार, खासदार आणि गणमान्य मंडळींसाठी भोजनावळ आयोजित करण्यात आली होती. या सोहळ्याला सुमारे ८ ते १० हजारांची उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, आता जयललिता यांच्या निधनाच्या वार्ताने हा संपूर्ण सोहळा अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. येथे सुमारे एक हजार अतिविशिष्ट मंडळी हजेरी लावण्याची शक्यता होती. दरम्यान, नोटाबंदीमुळे निर्माण झालेली चलनटंचाई आणि सर्व सामान्यांची होणारी होरपळ या पार्श्वभूमीवर हा लग्नसोहळा विरोधकांच्या टीकेचा विषय बनला होता.

[jwplayer ThsYZE9m-1o30kmL6]