गणेशोत्सवासाठी कोकणात जाणा-या सगळ्या वाहनांना टोलसवलत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी टोल सवलतीचा निर्णय जाहिर केला. कोकणात जाणा-या वाहनांना विशेष स्टिकर्स देण्यात येणार आहे. या स्टिकर्समुळे त्यांना टोलमध्ये सवलत मिळणार असल्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. गणेशोत्सवासाठी हजारो संख्येने चाकरमानी कोकणात जात असतात. याकाळात मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची गर्दी जास्त असते. परंतु सध्या या महामार्गाची अवस्था बिकट आहे. या महामार्गावर खड्डे आहेत ते बुझवण्याचे काम सुरू आहे त्यामुळे गणेशभक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई पुणे एक्सप्रेस मार्गावर वाहतुक वळवण्यात आली आहे. या सगळ्या वाहनांना सरसकट टोलमाफी देणे शक्य नसल्यामुळे फक्त टोलसवलत देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मंत्रिमंडळात झालेल्या बैठकित हा निर्णय घेण्यात आला. याआधी काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणा-या वाहनांना टोलमाफी देण्यात यावी अशी मागणी केली होती. तसेच काही दिवसांपूर्वी यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहले होते. जर गणेशोत्सवाच्या काळात टोलमाफी झाली नाही तर टोलनाक्यावर उभे राहुन आंदोलन करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला होता. परंतु सगळ्याच वाहनांना टोलमाफी देणे शक्य नसल्यामुळे फक्त ज्या मार्गावर वाहतुक वळवण्यात आली आहे तेथील टोलनाक्यावर टोलसवलत देण्यात आली असल्याचे केसरकर यांनी स्पष्ट केले.