प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोटिसीनंतर २३४० मेगाव्ॉट क्षमतेच्या चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील २१० मेगाव्ॉट क्षमतेचा पहिल्या क्रमांकाचा संच बंद झाला असला तरी एक हजार मेगाव्ॉटचा विस्तारित प्रकल्पातील चिमणी धुरांच्या रेषा हवेत काढत असल्याने प्रदूषणाची समस्या आणखीच जटील होत चालली आहे. या नवीन चिमणीतून सातत्याने धूर व कर्णकर्षक ध्वनी फेकत असल्याने प्रदूषणाची मात्रा वाढली आहे.

चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात २१० मेगाव्ॉट क्षमतेचे ४ व ५०० मेगाव्ॉट क्षमतेचे तीन, असे एकूण सात संच कार्यान्वित आहेत. यातील २१० मेगाव्ॉट क्षमतेचा संच क्रमांक एक ३० वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाल्याने कालबाहय़ झाला असला तरी तो सुरूच होता, परंतु प्रदूषण नियंत्रण मंडळाने हा संच तात्काळ बंद करण्याची नोटीस महाऔष्णिक वीज केंद्राला दिल्यानंतर आता कुठे तो बंद करण्यात आला आहे. त्यामुळे प्रदूषणाची मात्र काही प्रमाणात कमी झाल्याचा दावा प्रदूषण नियंत्रण मंडळाने केला, परंतु महाऔष्णिक वीज केंद्राच्या अन्य सहा संचांसोबतच विस्तारित एक हजार मेगाव्ॉट क्षमतेच्या प्रकल्पाची नवी चिमणी मोठय़ा प्रमाणात धूर सोडत असल्याने प्रदूषणात वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे.

चंद्रपूर देशातील चौथ्या क्रमांकाचे प्रदूषित शहर आहे. प्रदूषणात चौथ्या क्रमांकावर शहराला घेऊन जाण्यात चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचा खारीचा वाटा आहे. येथे वेकोलिच्या कोळसा खाणी, सिमेंट उद्योगांसोबतच ट्रक्सची वाहतूक मोठय़ा प्रमाणात आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ व नीरीच्या तज्ज्ञ अभ्यासकांनी केलेल्या सर्वेक्षणात प्रदूषणाचे मुख्य कारण वीज केंद्राच्या धुरासोबतच ट्रक्सची वाहतूकही आहे. शहरातील रस्त्याने भरधाव ट्रक गेला की, अक्षरश: धुळ उडते. त्यामुळे ट्रकमागे असलेला व्यक्तीचा चेहरा पूर्णत: काळवंडतो. आता नवीन वीज प्रकल्पामुळे पुन्हा प्रदूषणात भर पडणार आहे. सध्या हा विस्तारित प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू झालेला नाही. तरीही चिमणी धूर फेकत आहे. या चिमणीतून निघणाऱ्या धुरामुळे तुकूम, दुर्गापूर, वडगाव, बापटनगर, सिव्हील लाईन, रामनगर, शास्त्रीनगर परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. हा प्रकल्प महापालिकेच्या हद्दीत अगदी शहरात आलेला असल्याने त्याची संपूर्ण राख हवेत उडतांना दिसते. तसेच दुर्गापूर, पद्मापूर व तुकूम परिसरातील रस्त्ये, चारचाकी व दुचाकी गाडय़ांवर ही राख अक्षरश: दिसते.

दुसरीकडे सध्या या प्रकल्पात तांत्रिक काम सुरू आहे. बॉयलर सेटींगचे काम सुरू असतांना मोठा आवाज होत असल्याने ध्वनी प्रदूषणही होत आहे. यासंदर्भात शहरातील काही स्वयंसेवी संस्थांनी प्रदूषण नियंत्रण विभागाकडे तक्रारी केल्या, परंतु हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू झाल्याशिवाय ध्वनी प्रदूषण कमी होणार नाही, अशी उत्तरे देण्यात येत आहे. दरम्यान, किमान चिमणीतून निघणाऱ्या धुरामुळे होणारे प्रदूषण कमी करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. विशेष म्हणजे, हा धूर गेल्या कित्येक दिवसांपासून तसाच निघत असून त्याकडे वीज केंद्राचे दुर्लक्ष झाले आहे. आधीच प्रदूषणात चौथ्या क्रमांकावर असलेला हा जिल्हा आता पुन्हा प्रदूषणाच्या विळख्यात जाईल, अशीही भीती व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाने या विस्तारित प्रकल्पाच्या कामाकडे पूर्णत: दुर्लक्ष केले आहे. या नव्या प्रकल्पातील ध्वनी प्रदूषणामुळेही या परिसरातील लोक त्रासलेले आहेत, अशी तक्रार स्वयंसेवी संस्थांनी केली असली तरी त्याकडे लक्ष दिले जात नाही, असे लोकांचे म्हणणे आहे.