तुम्हाला गाडी चालवताना मोठ-मोठ्याने हॉर्न वाजवण्याची सवय असेल तर येत्या काळात ती सवय तुमच्या अंगाशी येऊ शकते. कारण राज्य सरकारने महाराष्ट्रातल्या २७ शहरांमध्ये ध्वनी मापन करायला सुरूवात केली आहे. पहिल्या टप्प्यात मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडी, मीरा भाईंदर, वसई-विरार, उल्हासनगर आणि पनवेल या शहरांमध्ये ध्वनी प्रदूषणाची मोजणी सुरू करण्यात आली आहे. लवकरच दुसरा टप्पा सुरू करण्यात येणार असल्याचेही राज्य सरकारने कोर्टात स्पष्ट केले आहे. सध्याच्या घडीला राज्यात ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होते आहे. शांतता परिक्षेत्र अर्थात सायलेन्स झोनमध्येही सर्रास हॉर्न वाजवले जातात. या सगळ्याचा त्रास अबालवृद्धांना होतो. तो टाळण्यासाठी आता सरकार कठोर कायदा आणण्याच्या तयारीत आहे.

राज्य सरकारच्या या नव्या निर्णयाचा फायदा महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाला होणार आहे. ध्वनी मापन केल्यामुळे कोणत्या शहरांत किती प्रदूषण किती प्रमाणात होते? सायलेन्स झोनमध्ये कोण हॉर्न वाजवते?, अकारण कोणाचा हॉर्न सुरू असतो, वाहतूक कोंडी दरम्यान हॉर्न वाजवण्याचे प्रमाण कोणाचे जास्त असते? या आणि अशा अनेक गोष्टींवर राज्य सरकार नजर ठेवणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण मंडळाला ध्वनी प्रदूषण होण्याचे नेमके कारण कळू शकते. तसेच अकारण सायलेन्स झोनमध्ये हॉर्न वाजवून तिथली शांतता भंग करणाऱ्याला शिक्षाही होऊ शकते.

मुंबईतल्या वडाळा, बांद्रा, पवई, अंधेरी, कांदिवली, चेंबूर आणि फोर्ट भागात सातत्याने ध्वनी प्रदूषण होत असल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाने म्हटले आहे. या सगळ्या प्रदूषणाचा रिअल टाईम डेटा कोर्टात सादर करण्यात आला आहे.

अभय ओक यांच्या खंडपीठाला आज सरकारतर्फे मुंबईतल्या ध्वनी प्रदूषणासंबंधीची माहिती देणअयात आली. आवाज फाऊंडेशन या एनजीओने प्रदूषणासंबंधीची याचिका दाखल केली आहे. त्याप्रकरणी आज सुनावणी झाली. त्याचवेळी राज्यातल्या २७ शहरांमधल्या ध्वनी प्रदूषणाचे मापन केले जाणार आहे, पहिल्या टप्प्यात ते सुरूही करण्यात आले आहे असे सरकारने म्हटले आहे. त्यामुळे  आता सायलेन्स झोनमध्ये आवाज कराल तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. महाराष्ट्र वाहतूक आणि रस्ते सुरक्षा कायदा २०१७ च्या अंतर्गत ध्वनी प्रदूषण करणाऱ्यांविरोधात कारवाई होऊ शकते असेही सरकारने कोर्टाला सांगितले आहे.