पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न असलेली बुलेट ट्रेन सुरू करण्यासाठी जपान सरकारशी करार करण्यात आला आहे. रेल्वे प्रशासनाने त्या दृष्टीने चाचपणी सुरू केली आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपच्या आमदारांचे स्वप्नरंजन सुरू झाले असून बुलेट ट्रेनला शिवसेनेने विरोध केला आहे; पण आता बुलेट ट्रेनचा प्रकल्प जणू काही लवकरच पूर्णत्वास येणार आहे, अशी जणू उत्तर महाराष्ट्रातील काही आमदारांची कल्पना झाली आहे. त्यामुळे मुंबई-अहमदाबाद या बुलेट ट्रेनला नाशिकला थांबा देण्याची मागणी करण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. त्यासाठी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे त्यांनी मोच्रेबांधणी सुरू केली आहे. बुलेट ट्रेन म्हणजे अतिवेगवान आणि कमीत कमी थांबे; पण आमदारांसाठी नाशिक; मग प्रत्येक आमदार, खासदार, मंत्र्यांच्या मागणीनुसार थांबे देण्याची मागणी सुरू झाली, तर ती प्रत्येक स्थानकावर थांबा असलेली पॅसेंजर किंवा उपनगरी गाडीच होईल, अशी टिप्पणी या मागणीवर झाली. त्यामुळे अजून बुलेट ट्रेनच्या आराखडय़ाचाही पत्ता नाही, भूसंपादन नाही अन् थांब्यांचीच चर्चा आधी सुरू झाली आहे.