‘पायरेथ्रम एक्स्ट्रॅक्ट’ कीटकनाशक कुचकामी ठरूनही पुन्हा काळ्या यादीतील नीता पॉल कंपनीला कंत्राट देण्यामागे मुंबई महापालिकेत गैरप्रकार झाला असल्याचा आरोप करून मंत्र्यांच्या उत्तराने असमाधानी झालेल्या विरोधकांनी बुधवारी विधानसभेत सभात्याग केला.
शशिकांत शिंदे व इतर सदस्यांनी डेंग्यूसंबंधी लक्षवेधी सूचना मांडली होती. ‘डासांना मारण्यासाठी नीता पॉल या कंपनीकडून  मुंबई महापालिकेने १,०५,००० लिटर ‘पायरेथ्रम एक्स्ट्रॅक्ट’ कीटकनाशक दोन टक्के निविदा प्रक्रिया खरेदी केले होते. क्षेत्रीय चाचणीत अपेक्षित ८० टक्के डास मृत न पावल्यामुळे निविदेतील अटीनुसार तेवढय़ा लिटर किमतीच्या वीस टक्के दंड रुपये ५० लाख ८५ हजार रुपये व उशिरा पुरवठा दंड, असे एकूण ६४ लाख ८८ हजार ३७५ रुपये इतका दंड आकारण्यात आला. त्यानंतर कंपनीने पुरवठा केलेल्या कीटकनाशकाच्या तपासणीत दोष आढळून आला नाही’, असे लेखी उत्तर आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिले.
त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे भास्कर जाधव यांनी शासन दिशाभूल करीत असल्याचा आरोप केला. छगन भुजबळ यांनी किती डास होते, किती जिवंत आहेत,  डासांची मोजमाप कशी होते? आदी उपप्रश्नांचा भडीमार केला. मंत्र्यांच्या उत्तरानंतर लगेचच दुसरी लक्षवेधी सूचना पुकारली.

डासांच्या मोजमापाचा विनोद
छगन भुजबळ  यांनी किती डास होते, किती जिवंत आहेत, डास मोजमाप कशी होते आदी प्रश्न विचारले असता सभागृहात विनोदाचे वातावरण निर्माण झाले होते. हे प्रश्न गंभीर असल्याचा उल्लेख करीत मंत्र्यांनी पद्धत सांगितली. एका बंद खोलीत डास सोडायचे. त्यात कीटकनाशकाची फवारणी करायची. खाली पडलेले डास खोलीत सोडलेल्या डासाच्या ८० टक्के असल्यास कीटकनाशकाची गुणवत्ता चांगली असल्याचे समजले जाते, असे मंत्र्यांनी सांगितले. त्यावर पुन्हा किती डास जिवंत राहिले, ते कुठे असे विचारले असता पुन्हा वातावरण हलकेफुलके झाले. मात्र, ते काही क्षणच.