मतदारांना धमकावल्याप्रकरणी खासदार उदयनराजे भोसले व कल्पनाराजे भोसले यांच्यासह चौघांबाबत झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने उदयनराजे व कल्पनाराजे भोसले यांच्यासह चौघांना नोटीस पाठवून त्यांचा खुलासा मागविण्यात आला आहे. तक्रारदारांनाही पुरावे सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या कराड येथील सभेत खासदार भोसले यांनी त्यांच्या भाषणामध्ये ‘याद राखा माझ्याशी गाठ आहे’, असे धमकावले. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आपचे उमेदवार राजेंद्र चोरगे व सागर भोगवाकर यांनी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली होती. मलकापूर येथे झालेल्या सभेमध्ये कल्पनाराजे भोसले यांनी मलकापूर येथील सभेत ‘उदयनराजेंना बदनाम करणाऱ्यांना सोडणार नाही,’ अशी धमकी दिली. त्यामुळे त्यांच्यावरही गुन्हा दाखल करावा अशी मागणी भोगावकर यांनी केली होती. हे प्रकरण पुढील कार्यवाहीसाठी कराड दक्षिणचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी शिरीष यादव यांच्याकडे आहे. या प्रकरणी उदयनराजे, कल्पनाराजे भोसले व मनोहर शिंदे यांना नोटीस पाठवून त्यांचा खुलासा मागितला आहे. तक्रारदारांनाही त्यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने पुरावे सादर करण्यास सांगण्यात आले आहे, अशी माहिती शिरीष यादव यांनी दिली आहे.