राजर्षी शाहू महाराजांनी वसवलेल्या शाहू मिलमधील २७ एकर जागेमध्ये त्यांच्या कार्याचा सर्वव्यापी, सर्वस्पर्शी आढावा घेणारे स्मारक व्हावे, या मागणीला आता कोल्हापुरात जोर धरू लागला आहे. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राजाराम माने यांची भेट घेऊन या प्रश्नी चर्चा केली.
मुंबईतील इंदू मिलची जागा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी देण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. याच धरतीवर करवीर नगरीचे भाग्यविधाते राजर्षी शाहू महाराज यांचे स्मारक शाहू मिलमध्ये व्हावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. शाहू मिल ही २७ एकर जागेमध्ये वसविण्यात आली आहे. त्याची मालकी सध्या राज्याच्या वस्त्रोद्योग महासंघाकडे आहे. महामंडळ या जागेवर गार्मेट पार्क उभारून खासगी उद्योजकाकडे ती जागा सोपविण्याच्या विचारात आहे. तथापि, या जागेवर गार्मेट पार्क होण्याऐवजी ते इतरत्र वसविण्यात यावी. शाहू मिलच्या जागेवर शाहू राजांच्या सर्वव्यापी कार्याचा वेध घेता येईल, असे स्मारक उभे करण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी माने यांच्याकडे केली.
कोल्हापुरात आल्यानंतर श्री महालक्ष्मीचे दर्शन घेतल्यानंतर पर्यटकांना प्रेक्षणीय असे महत्त्वाचे कोणतेही स्थळ नाही. त्यामुळे शाहू मिलमध्ये शाहू राजांचे सांस्कृतिक, सामाजिक कार्याचा आढावा घेणारे स्मारक उभे केल्यास पर्यटकांसाठी हे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आकर्षक प्रेक्षणीय स्थळ ठरेल. तसेच, देशभरातून येणाऱ्या शाहू राजांच्या विचारकांच्या पाईकांनाही प्रेरणास्थळ प्राप्त होईल. या दृष्टीने शासनाने सर्वसमावेशक आराखडा बनवावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली. या चर्चेत सामाजिक कार्यकर्ते पद्माकर कापसे, जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर, अनिल घाटगे, रामेश्वर पत्की, प्रताप जाधव आदींचा समावेश होता. या मिलमध्ये काम करणाऱ्या कामगारांसाठी काही जागा देण्यात येऊन त्यांनाही सामावून घ्यावे, अशी चर्चा झाली. कामगारांचा या प्रश्नी लवकरच मेळावा होणार आहे.