जगाच्या पाठीवर विविध ठिकाणी होत असलेला पर्यावरणाचा ऱ्हास आणि संवर्धन यातील संघर्ष उद्यापासून (२९ नोव्हेंबर) येथे सुरू होत असलेल्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात रत्नागिरीकरांना अनुभवायला मिळणार आहे.
येथील रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे गोगटे-जोगळेकर महाविद्यालय आणि पीपल्स एम्पॉवरिंग मूव्हमेंट (पेम-राजवाडी) यांच्यातर्फे संयुक्तपणे उद्यापासून (२९ नोव्हेंबर) २ डिसेंबपर्यंत महाविद्यालयाच्या प्रांगणात हा महोत्सव भरत आहे. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर आणि महोत्सव संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. श्रीरंग कद्रेकर यांनी त्याबाबत पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, किर्लोस्कर आणि वसुंधरा क्लब यांच्या पुढाकाराने गेली सहा वष्रे हा महोत्सव महाराष्ट्रासह पाच राज्यांतील पंचवीस शहरांमध्ये आयोजित केला जातो. मात्र कोकण विभागात गेल्या वर्षांपासून प्रथमच रत्नागिरी येथे हा महोत्सव साजरा होऊ लागला आहे. यंदा सलग दुसऱ्या वर्षी महाविद्यालयात होत असलेल्या या महोत्सवाचे उद्घाटन पर्यावरणपूरक उपकरणांचे ख्यातनाम संशोधक आणि ‘आरती’ (पुणे) संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. आनंद कर्वे यांच्या हस्ते गुरुवारी (२९ नोव्हेंबर) संध्याकाळी ६ वाजता राधाबाई शेटय़े सभागृहात होणार आहे. त्यानंतर २ डिसेंबपर्यंत सकाळ व संध्याकाळच्या सत्रांमध्ये मिळून पर्यावरणपूरक जीवनशैलीचे महत्त्व विशद करणारे निसर्ग, जैवविविधता आणि पर्यावरणविषयक सुमारे ४० लघुपट/चित्रपट दाखवण्यात येणार आहेत.
सागरी संपत्तीच्या क्षेत्रातील माफिया टोळीने जपानच्या किनाऱ्यावर चालवलेली डॉल्फिनची शिकार आणि या टोळीची बिंगे फोडणारा ‘द कोव्ह’ हा चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात सादर होणार आहे, तर त्यापाठोपाठ तीन दिवस प्रदर्शित होणाऱ्या लघुपट/चित्रपटांमधून रासायनिक खतांचे दुष्परिणाम, हवामान बदल आणि पर्यावरणाच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरणारे अन्य घटक प्रेक्षकांपुढे येणार आहेत. त्याचप्रमाणे अशा विपरीत परिस्थितीतही पर्यावरण जतन-संवर्धनाची लढाई यशस्वीपणे लढणाऱ्या व्यक्ती आणि समूहांच्या यशोगाथांवरील माहितीपट सादर होणार आहेत.
खारफुटीच्या क्षेत्रात मौलिक संशोधन केलेल्या डॉ. लीला भोसले (कोल्हापूर) यांचे व्याख्यान महोत्सवात ३० नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता होणार असून त्यापूर्वी ‘उपाहारगृहातील विघटनशील घटकांचे व्यवस्थापन’ या विषयावर पर्यावरणतज्ज्ञ डॉ. दर्पण देशपांडे (एक्सेल इंडस्ट्रीज, लोटे) यांचे सादरीकरण दुपारी १२.३० वाजता होणार आहे. निसर्ग सहलींच्या क्षेत्रात करिअरच्या संधींबाबत अमित पणारिया (जंगल लोअर) यांचे सादरीकरण १ डिसेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता होणार आहे आणि यंदाच्या महोत्सवाचे मुख्य सूत्र असलेल्या ‘पर्यावरणपूरक जीवनशैली’ या विषयावर डॉ. विनय र.र. यांची कार्यशाळा महोत्सवाच्या समारोपाच्या दिवशी (२ डिसेंबर) दुपारी २ वाजता होणार आहे. तसेच १ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजता डॉ. भोसले यांच्यासमवेत खारफुटीच्या जंगलात साखरतर येथे निसर्गफेरी आणि २ डिसेंबर रोजी ज्येष्ठ निसर्गतज्ज्ञ डॉ. प्रकाश गोळे (पुणे) यांच्यासमवेत पोमेंडीच्या परिसरात निसर्गफेरी महोत्सवाचे खास आकर्षण आहेत.
पर्यावरण व निसर्ग रक्षणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती/संस्थांना खास पुरस्कार महोत्सवात देण्यात येणार असून शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘जस्ट अ मिनट’ हा विशेष स्पर्धात्मक कार्यक्रम, पर्यावरण जतन-संवर्धनाची महती अधोरेखित करणारा ‘निसर्गायन’ हा वैशिष्टय़पूर्ण सांस्कृतिक आविष्कार, ‘सॅन्क्च्युरी एशिया’तर्फे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रंगीत छायाचित्रांचे प्रदर्शन, हौशी छायाचित्रकारांसाठी कार्यशाळा इत्यादी भरगच्च कार्यक्रम या महोत्सवात होणार आहेत.
रत्नागिरीतील भारतीय पर्यावरण व तंत्रज्ञान संस्था, आर्ट सर्कल, रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय, रत्नागिरी फिल्म सोसायटी, मराठी विज्ञान परिषद आणि गोगटे-जोगळेकर महाविद्यालय फिल्म क्लब या संस्थाही महोत्सवाच्या संयोजनात सहभागी झाल्या आहेत. संपूर्ण महोत्सव विनामूल्य असून त्यासाठी प्रवेशिकांबाबत गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात प्रसाद गवाणकर (९४२०१५८०८०) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.