‘सदाभाऊ खोत हा विषय आता आमच्यासाठी संपला आहे’, अशी ‘आत्मक्लेश’ प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी दिली. त्यामुळे स्वाभिमानी संघटनेच्या आत्मक्लेश यात्रेकडे पाठ फिरवलेले सदाभाऊ खोत कुठे आहेत? हा प्रश्न सगळ्यांना पडला होता. शेट्टींची आत्मक्लेश यात्रा मंत्रालयाच्या दिशेने निघालेली असताना, त्यांचे सवंगडी आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत शेतकऱ्यांच्या भेटीसाठी थेट बांधावर पोहोचल्याचे दिसून आले.

तुरीमुळे चिंता’तूर’ झालेल्या शेतकऱ्यांच्या अडचणींचा आढावा घेण्यासाठी खोत यांनी थेट बांध गाठल्यामुळे शेतकरी संघटनेतील राजकारण कोणत्या दिशेनं जाणार असा प्रश्न निर्माण होत आहे. शेतकरी संघटनेतून विभक्त होऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जन्म झाला. सध्या ज्या पद्धतीने वातावरण दिसते, त्यावरून येत्या काळात शेट्टी आणि खोत यांची दोन ‘तोंडं’ झालेली पाहायला मिळातील अशीच परिस्थिती दिसते.

‘आत्मक्लेश’ यात्रेकडे पाठ फिरवल्यामुळे राजू शेट्टी यांनी सदभाऊंच्या विषयाला पूर्ण विराम दिला. सदाभाऊ यांनी मात्र, ‘आत्मपरीक्षण’ करून नवीन विषयाला सुरुवात केल्याचे दिसले. शेतकरी नेता अशी ओळख असलेले सदाभाऊ सत्तेची उब लागल्यामुळे शेतकऱ्यापासून दुरावले असल्याची टीका विरोधक आणि त्यांच्या स्वकीयांकडून अनेकदा झाली. मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्याचं खंडन करण्याचा प्रयत्न सदभाऊंनी केला. त्यासाठी त्यांनी परभणी जिल्ह्याची निवड केली. दोन दिवसांपूर्वीच या जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष आणि सदाभाऊंच्या नेतृत्वाखाली काम केलेले माणिक कदम यांनी ‘आत्मभान हरवलेल्यांना शेतकऱ्यांची चिंता नाही’ अशी टीका केली होती. त्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बांधावर भेट घेत सदाभाऊंनी फासे उलटवण्याचा प्रयत्न सुरु केल्याचे दिसते.

परभणीमधील मानवत येथील तूर खरेदी केंद्राला भेट देऊन त्या ठिकाणचा आढावा घेत तात्काळ तूर खरेदी करण्याचे आदेश खोत यांनी सरकारी अधिकाऱ्यांना दिले. रात्री छुप्या पद्धतीने व्यापाऱ्यांची तूर खरेदी केली जात असेल, तर अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचा दम देखील त्यांनी भरला. शिवाय यावर लक्ष ठेवण्याच्या सूचना शेतकऱ्यांना केल्या. त्यानंतर सदाभाऊ सेलु तालुक्यातील कुंडी येथे कृषी विभागाची आढावा बैठक घेतली. शेतकऱ्यांच्या जीवावर मंत्री झालेले खोत यांना एसीची हवा लागल्याची टीका विरोधक आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे करतात. शेतकऱ्यांच्या शेतावर आढावा बैठक आयोजित करून आपल्या राजकारणाच्या केंद्रस्थानी शेतकरी असल्याचं दाखवून दिलं.