पीएसपीएस इंडिया मल्टीट्रेड अॅड शेअर, पीएमडी व केबीसी या कंपन्यांनंतर दामदुपटीचे आमिष दाखवून लोकांची कोटय़वधींची फसवणूक करणारी परभणीतील सक्सेस ट्रेड अॅण्ड सव्र्हिसेस प्रा. लि. ही बनावट कंपनी उघडकीस आली आहे. या कंपनीशी संबंधित पाच जणांना अटक करण्यात आली, तर इतर ११ आरोपी फरारी आहेत.
दामदुप्पट व तिप्पट रक्कमेचे आमिष दाखवून गोरगरीब जनता व मध्यमवर्गीयांची फसवणूक करण्याचे प्रकार चालू महिन्यात उघडकीस आले. जूनमध्येच परभणीतील पीएसपीएस या बनावट कंपनीचा घोटाळा उघडकीस आला. त्यानंतर पाथरीमध्ये पीएमडी कंपनीचाही घोटाळा समोर आला. या दोन्ही प्रकरणांत पोलिसात तक्रारी दाखल झाल्या. गेल्या १५ दिवसांत केबीसीचा सर्वात मोठा घोटाळा वाढत्या तक्रारींमुळे चव्हाटय़ावर आला. केबीसीचा मुख्य संचालक भाऊसाहेब चव्हाण, त्याची पत्नी व भावासह स्थानिक दोन एजंट दाम्पत्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. केबीसीविरोधात आता तक्रारींचा ओघ सुरू झाला आहे. या सर्व गुन्ह्यांचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून एकत्रित करण्यात येत आहे.
या ३ कंपन्यांच्या फसवणुकीचे प्रकरण चच्रेत असतानाच आता परभणीचेच पेडगाव रस्त्यावरील सक्सेस ट्रेड अॅण्ड सव्र्हिसेस प्रा. लि. या बनावट कंपनीचा फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. गेल्या शनिवारी येथील मध्यवर्ती बँकेतील कर्मचारी सुभाष आगलावे यांनी नानल पेठ पोलीस ठाण्यात या कंपनीविरोधात फसवणुकीची तक्रार दिली. या कंपनीकडेही दीड वर्षांत दुप्पट रक्कम देण्याची स्कीम होती. आगलावे यांनी ८० हजार रुपये गुंतवले. दर महिन्याला ४ हजार ५०० रुपयांचा परतावा देण्याचे आमिष त्यांना दाखवले होते. सुरुवातीचे ३ महिने परताव्याची रक्कम मिळाली. परंतु नंतर परतावा बंद झाला व कंपनीच्या कार्यालयाला टाळा पडला.
या प्रकरणी १६ आरोपींवर नानलपेठ पोलिसांत गुन्हा दाखल झाला. पकी रेणापुर (तालुका पाथरी) येथील रत्नाकर तुकाराम भुतकर, ज्ञानेश्वर हनुमान भुतकर, जिंतुर येथील सूर्यकांत बाबुराव तळेकर, अनिल बापुराव काळे (राजेंद्रगिरी नगर) व राजेश पांडुरंग घाडगे (भजन गल्ली, परभणी) या पाचजणांना अटक झाली. इतर ११ आरोपी फरारी असून यात विष्णू अवचार (इटाली, तालुका मंठा) व आत्माराम जाधव (भोसा) यांचा समावेश आहे.