लोकसभेत आघाडीच्या उमेदवाराचा दारुण पराभव झाल्यानंतर विधानसभा निवडणुकांची गोळाबेरीज करताना मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री मधुकर चव्हाण यांना बढती दिली आहे. दुय्यम मानल्या जाणाऱ्या दुग्धविकास व पशुसंवर्धन खात्यातून चव्हाण यांना महत्वाचे मानल्या जाणाऱ्या परिवहन मंत्रिपदी बढती मिळाली आहे. एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष जीवन गोरे व आता परिवहनमंत्री चव्हाण असे दोन नेते एकाच जिल्ह्यातील असल्यामुळे उस्मानाबादकरांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.
काँग्रेसचे निष्ठावान कार्यकत्रे म्हणून मागील विधानसभा निवडणुकीनंतर चव्हाण यांना पक्षश्रेष्ठींनी संधी दिली. विधानसभेचे उपसभापती व नंतर मंत्रिमंडळात दुग्धव्यवसाय, पशुसंवर्धन व मत्स्य व्यवसाय खात्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून समाविष्ट केले. माजी खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यानंतर पहिल्यांदाच अन्य व्यक्तीला जिल्ह्यात कॅबिनेट मंत्रिपद मिळाले. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात उत्साह संचारला होता. काँग्रेसच्या संघटनात्मक बांधणीला याचा फायदा झाला. चव्हाण कॅबिनेट मंत्री असतानाच जिल्ह्यात काँग्रेस-राष्ट्रवादीअंतर्गत वेळोवेळी कलगीतुरा रंगला. चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद व नगरपालिकेची निवडणूक काँग्रेसने राष्ट्रवादीस सोबत न घेता लढवली. लोकसभा निवडणुकीतही अर्धी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत, तर अर्धी महायुतीसोबत असे चित्र पाहावयास मिळाले. त्यामुळे आघाडीचे उमेदवार डॉ. पद्मसिंह पाटील यांचा तब्बल २ लाखांहून अधिक मतांनी पराभव झाला.
मागील तीन दशकांत प्रथमच पाटील यांच्या परिवाराकडे सभागृहाचे सदस्यत्व वा मंत्रिपद राहिले नाही. दुसरीकडे मंत्री चव्हाण यांना बढती देऊन परिवहन मंत्रिपदी वर्णी लावण्यात आली. परिवहन खाते बहुधा मुख्यमंत्र्यांकडे असे. एवढे महत्त्वपूर्ण खाते मधुकर चव्हाण यांच्या वाटय़ाला आल्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. पशुसंवर्धन मंत्री या नात्याने चव्हाण यांना जिल्ह्यात एकही महत्त्वपूर्ण प्रकल्प सुरू करता आला नाही. आता परिवहनमंत्री म्हणून जिल्हावासीयांच्या त्यांच्याकडून मोठय़ा अपेक्षा आहेत.
‘रिमोल्डिंग युनिट सुरू व्हावे’
एस. टी. महामंडळास लागणाऱ्या गाडय़ांच्या टायरचे रिमोिल्डग युनिट उस्मानाबादेत सुरू व्हावे, अशी अनेक दिवसांची मागणी आहे. महामंडळाचे अध्यक्षपद राष्ट्रवादीचे नेते जीवन गोरे यांच्याकडे व परिवहन मंत्रिपद चव्हाण यांच्या रूपाने काँग्रेसकडे, तसेच हे दोघेही उस्मानाबादचेच असल्यामुळे या मागणीकडे विशेष लक्ष आहे. परिवहनमंत्री म्हणून मिळणाऱ्या उण्यापुऱ्या तीन महिन्यांच्या काळात आघाडीचे उमेदवार निवडून यावेत, या दृष्टीने ते कोणते महत्त्वपूर्ण निर्णय घेतात, याकडेही लक्ष लागले आहे.