माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने ऑक्टोबरमध्ये घेतलेल्या दहावी व बारावीच्या परीक्षांचे निकाल आज, मंगळवारी संकेतस्थळावर जाहीर केले. नगर जिल्हय़ाचा इयत्ता दहावीचा निकाल ३८ टक्के लागला, तर बारावीचा निकाल १७.९८ टक्के लागला.
दहावीच्या परीक्षेसाठी जिल्हय़ात एकूण ३ हजार ८०६ विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली होती. त्यासाठी १६ परीक्षा केंद्रे निर्माण करण्यात आली होती. परीक्षेला मात्र ३ हजार ७४७ जण दाखल झाले. त्यातील उत्तीर्णाची संख्या १ हजार ४२४ आहे. बारावीच्या परीक्षेसाठी २ हजार ६६१ जणांनी नावनोंदणी केली होती. त्यासाठी जिल्हय़ात १० परीक्षा केंद्रे निर्माण करण्यात आली होती. २ हजार ६०९ जण परीक्षेला दाखल झाले. पैकी ४६९ जण उत्तीर्ण झाले.
आज केवळ परीक्षार्थीच्या क्रमांकानुसार गुण संकेतस्थळावर दाखवले जात होते. परीक्षार्थीना गुणपत्रिका आठ दिवसांनंतर शाळेत मिळणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. संकेतस्थळावर दरवर्षी जिल्हानिहाय निकाल जाहीर केले जात होते, यंदा मात्र त्याऐवजी केवळ राज्यातील विभागांचे निकाल सादर करण्यात आले आहेत.