एका कंत्राटी अभियंत्याला सेवेत कायम करण्यासाठी २० हजारांची लाच घेताना सोलापूर महापालिकेतील सहायक आयुक्ताला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून पकडले. शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास महापालिकेसमोरील नॉर्थकोट प्रशालेच्या इमारतीत पालिका निवडणूक कार्यालयात झालेल्या या कारवाईमुळे पालिका आयुक्त विजय काळम यांच्या प्रशासनाला धक्का बसला आहे.

प्रदीप साठे असे या कारवाईत सापडलेल्या सहायक आयुक्ताचे नाव आहे. काही महिन्यांपूर्वीच साठे हे महापालिकेत रूजू झाले होते. त्यांच्या कारभाराविषयी बऱ्याच तक्रारी होत्या. यातच लाचेच्या सापळ्यात ते अलगद सापडल्याने पालिका प्रशासनातील भ्रष्टाचार चव्हाटय़ावर आला आहे.

यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या लाच प्रकरणाची माहिती अशी, की महापालिकेत कंत्राटी पध्दतीने सेवेत असलेल्या एका अभियंत्याने सेवेत कायम करण्यासाठी अर्ज दाखल केला असता त्यानुसार कार्यवाहीची प्रक्रिया सुरू होती. पालिका आयुक्त विजय काळम यांनी संबंधित फाइलवर पंधरा दिवसांपूर्वीच सही करून सहायक आयुक्त साठे यांच्याकडे प्रकरण पाठविले होते. त्यानुसार संबंधित कंत्राटी अभियंता सहायक आयुक्त साठे यांची भेट घेतली असता त्यांनी या कामासाठी लाच मागितली. परंतु साठे यांच्या भ्रष्ट प्रवृत्तीविषयी मन:स्ताप झाल्याने संबंधित कंत्राटी अभियंत्याने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सोलापूर कार्यालयात तक्रार नोंदविली. त्यानुसार सापळा लावून साठे यांना कंत्राटी अभियंत्याकडून २० हजारांची लाच घेत असता पकडण्यात आले. सदर बझार पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सायंकाळी उशिरापयर्ंत सुरू होते.