केंद्र शासनाच्या जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत ताफ्यात नव्याने दाखल होणाऱ्या १०४ बसेसबाबत परिवहन समितीच्या सभेमध्ये पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. या वेळी प्रशासनाने याबाबतची प्रक्रिया लवकरच पूर्ण करून लवकरात लवकर या नव्या बसेस रस्त्यावर धावतील, अशी ग्वाही दिली.
केएमटीला जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत १०४ बसेस खरेदीसाठी ४२ कोटींचा निधी केंद्र शासनाने मंजूर केला. परंतु अजूनही या बसेस खरेदी करण्याची कार्यवाही पूर्ण होऊ शकलेली नाही. त्यामुळे केएमटीचे नुकसान होत असल्याचा विषय यशोदा मोहिते यांनी परिवहन सभेत मांडला. शहरामध्ये उभ्या करण्यात येत असलेल्या ५४ बस शेड्सचे काम कधी पूर्ण करणार अशी विचारणा करण्यात आली. या वेळी बस शेड्स उद्यापासून बसविण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आली. सतीश लोळगे यांनी खुल्या बाजारातील डिझेलचे दर कमी झाल्याने प्रवासी तिकिटाचे दर कमी करण्याची सूचना केली. त्यावर अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक संजय भोसले यांनी या कामी स्वत: पाठपुरावा करणार असल्याचे स्पष्ट केले. कंत्राटी वाहक-चालक यांच्या नियुक्तीचा मुद्दाही लोळगे यांनी या वेळी उपस्थित केला. त्यावर कंत्राटी चालकांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली असल्याने नियुक्तीची कार्यवाही लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली. या वेळी झालेल्या चच्रेत परिवहन समिती सदस्य राजाराम गायकवाड, जालंदर पोवार, परीक्षित पन्हाळकर, स्मिता माळी, रेखा पाटील, संगीता देवेकर यांनी भाग घेतला.