वारुळातून मुंग्या बाहेर याव्यात तशी रायगड जिल्ह्यातील गावागावातून सामाजिक बहिष्काराची अनेक प्रकरणे आता समोर येण्यास सुरुवात झाली आहे. श्रीवर्धन तालुक्यातील भरडखोल गावातही गावकीच्या जाचाचे असेच एक प्रकरण समोर आले आहे. घरगुती वादातून वयोवृद्ध दाम्पत्याला वाळीत टाकले असल्याची तक्रार पोलीस उपअधीक्षकांकडे दाखल करण्यात आली आहे.
नथुराम पांडू घडशी (वय ८५), लक्ष्मी नथुराम घडशी (वय ६५) अशी या वयोवृद्ध दाम्पत्याची नावे आहेत. घरगुती वादातून दोघांनाही कुणबी समाज मंडळाने बहिष्कृत केले असल्याची तक्रार या दोघांनी श्रीवर्धन पोलीस उपअधीक्षकांना दिलेल्या निवेदनात केली आहे. पांडुरंग घडशी यांना दोन मुले आहेत. या दोघांची लग्ने झाली आहेत. घडशी यांची मोठी सून देवदेवस्की करून त्रास देत असल्याची तक्रार एका मुलाने गावकीकडे केली होती. यानंतर गावकीने बठक बोलावून २० हजार रुपयांचा दंड ठोठावला. हा दंड मान्य नसल्याने संपूर्ण कुटुंबाला वाळीत टाकण्यात आले. मात्र वाळीत टाकण्याची अवहेलना सहन न झाल्याने मोठय़ा मुलाने गावकीने लादलेला २० हजार रुपयांचा दंड भरला आणि बहिष्कार मागे घेण्याची मागणी केली. त्यानंतर बहिष्कार मागे घेण्यात आला.
मात्र कालांतराने घडशी यांची पत्नी आजारी पडली असताना मुलगा राजेश आपल्या पत्नीसह सासरी निघून गेला. त्यानंतर त्यांनी जमिनीचा हिस्सा मागण्यास सुरुवात केली. तेव्हा नथुराम घडशी यांनी राजेश याच्या लग्नावेळी घेतलेले कर्ज फेड, त्यानंतर जागा देतो, असे सांगितले. राजेशने हा वाद पुन्हा एकदा गावकीत नेला. गावकीचे अध्यक्ष राजेशचे सासरे असल्याने त्यांनी नथुराम यांचे म्हणणे न ऐकून घेता पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला, आणि जागा देण्याचे फर्मान सोडले. मात्र हा न्याय मान्य नसल्याचे नथुराम यांनी सांगितले. म्हणून नथुराम त्यांची पत्नी लक्ष्मी आणि सून अर्चना यांना गावकीने वाळीत टाकले. गावातील सार्वजनिक उत्सव, लग्न कार्य, सणात सहभागी होण्यावर बंधने घालण्यात आली. गावातील लोकांनी घडशी यांच्याशी संबंध ठेवू नयेत, असे फर्मानही काढण्यात आले असल्याचे घडशी यांनी सांगितले. गेल्या सहा वर्षांपासून कुटुंबाची मानसिक, आíथक कुचंबणा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे २४ मे २०११ मध्ये घडशी यांनी दिघी सागरी पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली होती. मात्र पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. जिवंतपणी नरकयातना भोगाव्या लागत असल्याने या अन्यायातून आपली सुटका व्हावी आणि दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी घडशी यांनी पोलीस उपअधीक्षकांकडे केली आहे.