शहरातील कांदे-बटाटय़ाच्या आडत व्यापाऱ्याकडे पोलिसांना सुमारे ९९ लाख ९८ हजार ५०० रुपयांच्या चलनातून बाद करण्यात आलेल्या नोटा आढळल्या. तोफखाना पोलिसांनी त्या जप्त केल्या आहेत. संजय नामदेव शेलार (४८, मुळ रा. राळेगण म्हसोबा, ता. नगर, सध्या रा. संत नामदेवनगर, बायजाबाई सोसायटी, सावेडी, नगर) असे या व्यापाऱ्याचे नाव आहे. त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. अधिक चौकशीसाठी पुण्यातील प्राप्तिकर विभागाला पत्र पाठवले जाणार आहे. सरकारने चलनातून बाद केलेल्या १ हजार रुपये दराच्या ६० लाख २६ हजार व ५०० रुपये दराच्या ३९ लाख ७२ हजार ५०० रुपयांच्या नोटा जप्त केल्या आहेत.

तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक नारायण वाखारे यांनी ही माहिती दिली. आडत व्यापारी शेलार याच्या बंगल्यात पोलिसांना नोटा मोजण्याचे यंत्रही आढळले. शहरातील बाजार समितीच्या आवारात शेलरा याचा आडत व्यवसायाचा गाळा आहे. आज, रविवारी सकाळी ९ च्या सुमाराला शेलार रोख रकमेची बॅग व इनोव्हा गाडी घेऊन बंगल्याच्या बाहेर पडत असतानाच वाखारे यांच्या पथकाने छापा टाकला. पोलिसांना पाहताच तो बॅग घेऊन बंगल्यात पळाला व त्याने बेडरुमच्या पलंगाखाली बॅग टाकून दिली. प्रवासी बॅगेत गच्च भरलेल्या नोटांची बंडले होती. जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त अधीक्षक घनश्याम पाटील, सहायक पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी करण्यात आली.

शेलार याच्याकडे चलनातून बाद झालेल्या जुन्या नोटांची बंडले असल्याची माहिती वाखारे यांना दोन दिवसांपूर्वी मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पाळत ठेवली होती. आज सकाळी सापळा लावला तेव्हा शेलार नोटांची बॅग घेऊनच बाहेर पडत होता, त्यामुळे चलनातून बाद झालेल्या नोटांची विल्हेवाट करण्यास जात असल्याचा संशय आहे. या नोटा आपल्या स्वत:च्याच असल्याची कबुली त्याने पोलिसांकडे दिली. मुलीच्या विवाहासाठी रक्कम आणली होती तसेच ती बँकेत भरायची राहून गेली, असा खुलासा त्याने पोलिसांकडे केला. मात्र त्याच्या मुलीचा विवाह दोन महिन्यांपूर्वीच झालेला असताना एवढी मोठी रक्कम त्याने घरात कशासाठी ठेवली याचे कोडे आहे. शेलार याला दोन मुली व एक मुलगा आहे. मुलगा पुण्यात शिकतो आहे.

पोलिसांनी छापा टाकला तेव्हा बंगल्यात तो एकटाच होता. कुटुंब गावी, राळेगण म्हसोबा येथे पाठवल्याची माहिती त्याने दिली. त्यामुळे पैशाची विल्हेवाट लावण्याचा प्रकार पूर्वनियोजित असावा, असा संशय घेतला जात आहे. अधिक चौकशीसाठी हे प्रकरण प्राप्तिकर विभागाकडे सोपवले जाणार आहे तसेच चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे समन्सपत्र शेलार याला बजावले जाणार आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार, कँप पोलीस ठाण्याचे निरीक्षक देशमाने, सहायक उपनिरीक्षक कृष्णा वाघमारे, विश्वास गाजरे, संजय चोरडिया, दीपक रोहकले, भास्कर गायकवाड, संजय काळे, नितीन भताने आदींच्या पथकाने कारवाईत भाग घेतला.

परदेशी नागरिकांचा सहभाग?

देशातील नागरिकांसाठी चलनातून बाद झालेल्या १ हजार व ५०० रुपये दराच्या नोटा व्यवहारात आणण्याची मुदत संपून गेली असली तरी परदेशातील भारतीयांसाठी (एनआरआय) ही मुदत ३० जूनपर्यंत आहे. नगर शहराजवळील मेहेराबाद येथे मोठय़ा संख्येने परदेशी भाविक येत असतात. या नागरिकांमार्फत आडत व्यापारी शेलार जुन्या नोटा चलनात आणण्याचा उद्योग करत असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांना या व्यवहाराचीही माहिती उपलब्ध झाली होती. मात्र प्रत्यक्ष शेलार याला या व्यवहारात पकडता आले नाही, असे खात्रीलायक समजले. तोफखाना पोलिसांनीच तीन महिन्यांपूर्वी चलनातून बाद झालेल्या नोटांच्या स्वरुपातील ३८ लाख रुपये एका किराणा व्यापाऱ्याकडून जप्त केले होते. या व्यापाऱ्यावर नंतर प्राप्तिकर विभागाने दंडात्मक कारवाई केली.