माजी जिल्हाप्रमुख सुनील बागूल यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
तीन दशकांपासून कार्यकर्ता व पदाधिकारी म्हणून शिवसेनेतील अनेक चढ-उताराचे साक्षीदार राहिलेले माजी जिल्हाप्रमुख सुनील बागूल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाचा निर्णय घेताना आणि त्याआधीही खा. संजय राऊत यांच्यावर केलेली टीका सर्वसामान्य शिवसैनिक व माजी पदाधिकाऱ्यांच्या अंतरीच्या भावनांना वाट मोकळी करून देणारी ठरली आहे. बागूल यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या निर्णयाशी असहमती दर्शविणाऱ्या अनेक पदाधिकाऱ्यांनीही राऊत यांची भूमिका सदैव अनाकलनीय राहिल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
एक कडवट शिवसैनिक तर जिल्हाप्रमुख अशी वाटचाल केलेल्या बागुल यांच्यावर त्यांनी ‘ममता दिनी’ घेतलेल्या भूमिकेवरून नाराज होत पक्षश्रेष्ठींनी हकालपट्टीची कारवाई केली. या कारवाईनंतर व्दिधा मनस्थितीत सापडलेल्या बागूल यांच्या वतीने माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, शिवाजी सहाणे, नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी यांनी कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांच्याकडे शिष्टाई केली. ही शिष्टाई सफल ठरण्याची चिन्हे दिसत असतानाच बागुल यांनी पुन्हा समर्थकांचा मेळावा घेत राऊत यांच्यासह जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महापालिकेतील नेते सुधाकर बडगुजर, अजय बोरस्ते यांना टिकेचे लक्ष्य केले. विशेषत्वाने बडगुजर व राऊत यांच्यावर त्यांचा अधिक रोष राहिला. त्यानंतर राष्ट्रवादीत प्रवेश करतानाही बागूल यांनी राऊत यांच्यावर टिकेचा भडिमार केला. राऊत यांनी जिल्हा शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांच्या निवडीमध्ये लक्ष्य घालण्यास सुरूवात केल्यापासून अनेक निष्ठावंत पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली होती.
 नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीतही उमेदवार ठरवितांना हमखास निवडून येतील अशा इच्छुकांना उमेदवारीच देण्यात आली नव्हती. त्यावरूनही बराच गदारोळ झाला होता. नाराज इच्छुकांनी आपणास उमेदवारी न मिळण्यामागचे कारण काय हे स्पष्ट व्हावे, असा टाहो फोडला होता. ‘महापालिकेतील कंत्राटदार’ अशी विरोधकांकडून सातत्याने संभावना होणाऱ्या बडगुजर यांच्यावर राऊत यांचा विशेष लोभ असल्याचे शिवसैनिकांमध्ये मानले जाते. त्यातच बडगुजर आणि जिल्हाप्रमुख करंजकर यांच्यामध्येही स्नेहभाव वाढीस लागल्याने आपल्या नंतर पक्षात आलेल्यांना मिळणारे महत्व पाहून बागूल यांच्यासारख्या माजी पदाधिकाऱ्यांच्या मनात सल निर्माण होणे साहजिकच. ती नेमकी नको त्या दिवशी व्यक्त झाली. बागूल यांच्या जाण्यामुळे शिवसेनेचे किती नुकसान होईल हे लगेच कोणतीही निवडणूक नसल्याने समजणे कठीण असले तरी राऊत यांच्यावर केलेल्या आरोपांविषयी ‘काही बोलायचे आहे पण..’ अशीच शिवसैनिकांची स्थिती आहे.