जामनेर तालुक्यातील पहूर येथून जवळच असलेल्या काशामळा शिवारात शनिवारी सकाळी एका वृद्धाचा दगडाने ठेचून खून झाल्याची घटना उघडकीस आली.
शिवाजी उखडू पाटील (८०) असे त्यांचे नाव आहे. शुक्रवारी रात्री शौचास जाण्यासाठी ते घरातून निघाले. तास-दीड तास होऊनदेखील ते घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्यांचा गावात शोध घेतला; परंतु ते कुठेही आढळून आले नाहीत. सकाळी गावापासून दोन किलोमीटर अंतरावर काशामळा शिवारात रस्त्याच्या कडेला शिवाजी पाटील यांचा मृतदेह आढळून आला. पाटील यांच्या डोक्यावर दगडाने वार केल्याचे दिसत होते. या घटनेची माहिती समजल्यानंतर पोलिसांनी धाव घेतली. पाटील यांच्या हातातील सोन्याची अंगठी गायब असल्याने हा खून चोरीच्या उद्देशाने झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
घटनास्थळी श्वानपथकाला पाचारण करण्यात आले; परंतु जवळच्या एका विहिरीपर्यंत जाऊन ते घुटमळले. तसेच ठसेतज्ज्ञांनी देखील घटनास्थळावरून नमुने घेतले आहेत. चाळीसगाव विभागाचे अपर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना केल्या आहेत. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.