पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर मोटारीचा टायर फुटल्यामुळे ती रस्तादुभाजक तोडून विरुद्ध दिशेला गेली व समोरून येणाऱ्या कारवर आदळल्यामुळे अॅटलस कॉप्को कंपनीचे वरिष्ठ अधिकारी ठार झाले, तर इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. उर्से टोलनाक्याजवळ बुधवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास हा अपघात झाला. गेल्याच आठवडय़ात अशा प्रकारे मोटार रस्ता दुभाजक तोडून पलीकडे गेल्यामुळे चित्रपट अभिनेते आनंद अभ्यंकर आणि अक्षय पेंडसे यांचा मृत्यू झाला होता.
व्ही. पी. गोपाळ (वय ५५, रा. ठाणे) यांचा मृत्यू झाला आहे. ते कासारवाडीजवळील अॅटलास कॉप्को कंपनीत आयात व निर्यात विभागाचे प्रमुख म्हणून काम करत होते. रोचक कोहली आणि दीप्ती कोहली (रा. सेक्टर २७, निगडी प्राधिकरण) अशी जखमींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपाळ हे ठाण्याहून आपल्या मोटारीने पुण्याकडे बुधवारी सकाळी येत होते. उर्से टोलनाक्याजवळ त्यांच्या टोयोटा मोटारीचा उजव्या बाजूचा पुढील टायर अचानक फुटला. त्यामुळे मोटारीवरील नियंत्रण सुटल्यामुळे मोटार रस्ता दुभाजक तोडून विरुद्ध दिशेला गेली. ही टोयोटा मुंबईला निघालेल्या कोहली दाम्पत्याच्या मोटारीला जाऊन धडकली. यामध्ये गोपाळ यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. तर कोहली दाम्पत्यावर लोकमान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गोपाळ गेल्या ३३ वर्षांपासून कंपनीत होते. ते मुंबईत रुजू झाले, पुढे त्यांची पुण्यात बदली करण्यात आली होती. ते दर शनिवार आणि रविवारी ठाण्याला आपल्या घरी जात होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे असा परिवार आहे, अशी माहिती कंपनीतील एका अधिकाऱ्याने दिली.
बऊर अपघातामध्ये तिघे जखमी
चालकाचे मोटारीवरील नियंत्रण सुटल्यामुळे मोटार रस्ता दुभाजक तोडून विरुद्ध दिशेला जात झालेल्या अपघातात तिघेजण जखमी झाले. बऊर गावाच्या हद्दीत मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास हा अपघात झाला. यांच्यावरही निगडी येथील लोकमान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नितीन पांडुरंग कोपीकर (वय २९, रा. माजी सैनिकनगर, येरवडा) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. यांच्यासोबत असलेल्या दोघांना किरकोळ मार लागला असून त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत.