स्वस्त दरात सोने देण्याची थाप मारून फसविणा-या टोळीला पंढरपूरच्या पोलिसांनी अटक केली. या टोळीकडून दीड किलो बनावट सोने जप्त करण्यात आले आहे. टोळीतील दोघांना पकडण्यात आले असताना अन्य एका महिलेसह दोघांनी गुंगारा देऊन पळ काढला. त्यांचा शोध घेतला जात आहे. अटकेतील दोघांना पोलीस कोठडी मिळाली आहे.
संतोष भीमराव गदळे (रा. देव दहिफळ, ता. केज, जि. बीड, सध्या रा. यशवंतनगर, आंबा चौक, सांगली) व पांडुरंग शंकर वळकुडे (रा. विश्रामबाग, सांगली) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा संशयित भामटय़ांची नावे आहेत. त्यांचे अन्य दोघे साथीदार पळून गेले. यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुनील मोहन सपकाळ (४९, रा. इसबावी, पंढरपूर) यांचे पंढरपुरात सलून दुकान आहे. त्यांच्याकडे आलेल्या एका ग्राहकाने ‘आपल्याकडे आटणीचे उरलेले सोने आहे, ते आपण कमी किमतीत विकतो, तुम्हाला पाहिजे असल्यास सांगा’ असे सांगून त्यांचा मोबाइल क्रमांक घेतला. त्यानंतर दोन दिवसांनी तो ग्राहक पुन्हा सपकाळ यांच्या दुकानात येऊन एक तोळे वजनाचे सोने दाखवले. या आमिषाला बळी पडून सपकाळ यांनी प्रति तोळा २० हजार रुपये दराने सोने घेण्याचे ठरवले. परंतु सोने घेताना त्यांच्याकडे केवळ पाच हजारांची रक्कम होती. तेवढी रक्कम त्यांनी आगाऊ म्हणून दिली व उर्वरित १५ हजारांची रक्कम नंतर देण्याचे ठरले.
दरम्यान, सपकाळ यांना नंतर मोबाइलद्वारे संपर्क करून त्या व्यक्तीने पैसे घेऊन कुर्डूवाडी रस्त्यावर येण्यास सांगितले. सपकाळ व त्यांचे मित्र सुनील गायकवाड या दोघांनी कुर्डूवाडी रस्त्यावर जाऊन ग्राहकाची भेट घेतली. त्या वेळी कारमधून आलेल्या त्या व्यक्तीसोबत अन्य तिघे जण होते. त्यांनी सोन्याची अंगठी दाखवून १५ हजारांची मागणी केली. तसेच सोने विक्रीसाठी इतर योजनाही सांगितल्या. परंतु सपकाळ यांना संशय आल्यामुळे त्यांनी सोने सराफाकडे तपासून घेतो व नंतर पैसे देतो, असे सांगितले. तेव्हा चौघांनी सपकाळ यांच्याशी हुज्जत घातली. तेव्हा आसपासचे लोकही एकत्र आल्यामुळे काही वेळातच चौघांनी पळ काढला असता त्यातील दोघांना पकडण्यात आले. सपकाळ यांच्या फिर्यादीनुसार या टोळीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.