हरिनाम सप्ताहाच्या वर्गणीचा हिशोब मागितला म्हणून ४५ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याच्या प्रकरणातील सूत्रधार, भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता लक्ष्मण घुले याच्या साथीदारांची पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे. बलात्काराच्या आरोपातील एकाला, तर मारहाण प्रकरणातील १२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. राजेगाव (ता. नेवासे) येथील घरांमधील प्रमुख व्यक्तींनी पोबारा केल्याने महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिसांची विशेष कुमक ठेवण्यात आली आहे.
या प्रकरणाचे राज्यभर पडसाद उमटले असून, अनेकांनी या घटनेचा निषेध केला आहे. श्रीरामपूर विभागाच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुनीता साळुंके ठाकरे या गावात ठाण मांडून आहेत.  
पीडित महिलेवर नगरच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  पोलिसांना काही पुरावे मिळाले असून ते ताब्यात घेऊन न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. महिलेवर सामूहिक अत्याचार झाल्याचा वैद्यकीय अहवाल दिला आहे. बलात्कारापूर्वी महिलेला बेदम मारहाणही करण्यात आली होती, असेही अहवालात म्हटले आहे.