उद्योगमंत्री नारायण राणे आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी मंगळवारी राजकीय भिंती ओलांडत एकमेकांवर स्तुतीसुमने उधळल्याने एरवी राजकारणात एकमेकांवर टीका-टिप्पणी करणारे ते हेच आहेत काय, असा प्रश्न बुटीबोरी येथील कार्यक्रमाला उपस्थितांना पडला. औद्योगिक धोरणासंबंधीच्या विविध बाबींवर विरुद्ध पक्षांचे मतभेद असले तरी राणे-गडकरी यांचा ‘एक सूर एक ताल’ असल्याचे यानिमित्ताने दिसून आले.
इंम्डोरामा कामगार गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या माध्यमातून इंडोरामा कंपनीमधील २७२ कामगारांसाठी घरकुले बांधण्यात आली. त्यांचे हस्तांतरण उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते झाले. वास्तविक राणे काँग्रेसचे आणि ही घरे उभारण्यास मनापासून पुढाकार घेतला तो भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी. राणे उद्योगमंत्री आहेत. बुटीबोरी औद्योगिक वसाहतीत कामगारांसाठी अत्यंत कमी दरात घरे बांधण्यासाठी शासनाची पर्यायाने उद्योगमंत्र्यांची मदत आवश्यक होती. उद्योगमंत्री या नात्याने राणे यांनी केवळ १५ रुपये वर्गफूट दराने घरे उपलब्ध करून दिली व त्यामुळे घरे बांधणे शक्य झाले, या शब्दात नितीन गडकरी यांनी राणे यांची स्तुती केली.
इतक्या कमी दराने घरे बांधली जातात, यावर विश्वासच बसला नाही. सांगणे वेगळे आणि कृती करणे वेगळे. गडकरींनी ते यशस्वीपणे करून दाखविले, ही कौतुकास्पद बाब असून त्यासाठी ‘धन्यवाद’ शब्द थिटा पडेल. या जमिनीवर घरे बांधण्यासाठी कंत्राट तुम्ही घ्या, आमची तयारी आहे. एवढय़ा स्वस्त दरात घरे बांधून देऊन उत्तम काम केले. हे सातत्याने करीत रहा, आमचे नेहमीच सहकार्य राहील. खरे म्हणजे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर गडकरी दिल्लीला गेले आणि नागपूरला विसरले असतील, असे वाटले. हे काम बघून ते ना नागपूरला विसरले ना गरिबांना, हे सिद्ध झाले, या शब्दात उद्योग मंत्री नारायण राणे यांनी नितीन गडकरींचे कौतुक केले. एमआयडीसीने काय करायला हवे, हे गडकरींनी सांगितले, हे बरे झाले, असे सांगत त्यावर सकारात्मक निर्णय होईल हे सुद्धा राणे यांनी जाहीर करून टाकले. काही दिवसांपूर्वी भाजपमधील राज्यातील शीर्षस्थ नेत्यांनी औद्योगिक घोरणावर कडाडून टीका केली होती. गडकरी व राणे यांनी एकमेकांवर बांधलेले स्तुतीस्तुमनांची भाजप व काँग्रेसमध्ये खमंग चर्चा होती.