दोघांचा मृत्यू; १२ गंभीर जखमी

येथील मोची गल्लीत गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास मोची समाजातील दोन गटांत दहीहंडीच्या कार्यक्रमानंतर झालेल्या हाणामारीत महावीर गजानन कुरील व जितेंद्र प्यारेलाल कुरील या दोघांचा मृत्यू झाला असून या घटनेतील प्राणघातक हल्ल्यात १२ जण जखमी आहेत. त्यातील तिघांची प्रकृती अत्यवस्थ आहे. जखमींवर नांदेडच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात शुक्रवारी सायंकाळपर्यंत कुठलाही गुन्हा दाखल झालेला नव्हता.

मोची समाजातील दोन गटात अनेक दिवसांपासून वाद होता. त्यातून वारंवार किरकोळ भांडणे यापूर्वी झाली आहेत. गुरुवारी लखन कुरील यांच्या रामराज्य मित्रमंडळाच्या वतीने महात्मा गांधी चौकात दहीहंडीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रात्री नऊच्या सुमारास दहीहंडीचा कार्यक्रम पार पडतो न पडतो तोच मोची गल्लीत दोन गटात वादाला सुरुवात झाली. वाद होत असल्याची खबर गांधी चौकात कळताच दहीहंडी कार्यक्रमातील मंडळी घटनास्थळाकडे धावली.

रात्री दहाच्या सुमारास दोन्ही गटातून झालेल्या प्राणघातक हल्ल्यात महावीर गजानन कुरील (वय २५) व जितेंद्र प्यारेलाल कुरील (वय ४५) या दोघांचा मृत्यू झाला. तर पवन कुरील, विजय कुरील, पवन हिरालाल कुरील, विनोद कुरील, कालीचरण कुरील, बजरंग कुरील, राजु कुरील, हिरालाल कुरील, अरुण कुरील, गजानन कुरील, आनंद कुरील व श्याम महादेव कुरील हे १२ जण गंभीर जखमी असून त्यांना नांदेड येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. यावेळी झालेल्या दंगलीत जमावाने इंडिका कार तसेच दुचाकी वाहनांची तोडफोड केली आहे.

घटनेसंदर्भात जबाब नोंदविण्यासाठी पोलीस निरीक्षक मुलगीर आपल्या पथकासह नांदेडला रवाना झाले आहेत. या घटना रात्री घडल्यानंतर पोलिसांनी झालेल्या हाणामारीतील साहित्य जप्त केले आहे. घटना घडल्यानंतर रात्रीपासूनच मोची गल्लीत चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

दुपारी चारच्या सुमारास नांदेडहून जितेंद्र प्यारेलाल कुरील यांचा मृतदेह हिंगोलीत आणण्यात आला असून दुसऱ्याचा मृतदेह शुक्रवारी सायंकाळपर्यंत आणण्यात आला नव्हता. सायंकाळपर्यंत या घटनेत गुन्हा दाखल झाला नव्हता. नांदेडला गेलेले पथक परत आल्यानंतर शहर पोलिसात सायंकाळी उशिरा गुन्हा दाखल होण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी वर्तविली आहे.