केंद्र सरकारची दमबाजी एका बाजूला आणि दुसरीकडे ढगाळ हवामानामुळे साठवणक्षमता कमी झाल्याने बाजारातील कांद्याची आवक वाढल्याने दरात प्रतिक्विंटल २०० ते ५०० रुपये घट आली आहे. भावातील घसरणीमुळे शेतक-यांत अस्वस्थता वाढली आहे.
केंद्र सरकारने चीन, इजिप्त, पाकिस्तान आदी देशांतून एक लाख टन कांदा आयात करण्यास व्यापा-यांना परवानगी दिली. तसेच निर्यातमूल्यात वाढ केली. आंध्र प्रदेश सरकारने व्यापा-यांना २० ते २२ रुपयांपेक्षा जास्त दराने कांदा विकण्यास मनाई केली आहे. त्याचा परिणाम कांद्याच्या भावावर झाला आहे. आंध्र प्रदेश व कर्नाटकातून नवीन कांद्याची आवक सुरू झाली आहे. तर राज्यात शेतक-यांनी कांदाचाळीमध्ये साठवून ठेवलेला कांदा खराब व्हायला सुरुवात झाली आहे. ढगाळ हवामान व आर्द्रता यामुळे कांदा सडत आहे. आता अधिक भाव वाढण्याची शक्यता नाही, त्यामुळे नगर जिल्ह्यातील घोडेगाव, वांबोरी, नगर, राहुरी, श्रीरामपूर, राहाता या बाजार समित्यांच्या आवारात मोठय़ा प्रमाणात कांद्याची आवक सुरू झाली असून २०० ते ५०० रुपयांनी भावात घसरण सुरू झाली आहे. कांदा १ हजार ८०० ते २ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल या दराने विकला जात आहे.
यंदा खरीप व लाल कांद्याची लागवड झालीच नाही. मागील वर्षी गारपिटीमुळे कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले. शेतक-यांना निम्मा कांदा शेतात फेकून द्यावा लागला. खरीप हंगाम वाया गेला आहे. भूगर्भातील पाणीपातळी खाली गेली आहे. चाळीमध्ये थोडाफार कांदा साठवला आहे. त्यापासून चांगले पैसे मिळाले तर शेतकरी दुष्काळाला तोंड देऊ शकला असता. पण आता सरकारच्या धोरणाने त्याला रडवायला लावले आहे. अनेक शेतक-यांचा उत्पादनखर्चही वसूल होणार नाही, अशी परिस्थिती आहे.