अस्थिरतेमुळे सट्टेबाजांचा लाभ; शेतकरी आणि ग्राहकांचे नुकसान

कांद्याच्या दारात कृत्रिम तेजी निर्माण करून बाजार समित्या तसेच व्यापाऱ्यांनी नफेखोरी सुरू केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तेजीचा फायदा मिळणे कठीण बनले असून व्यापारात कधी नव्हे एवढी अस्थिरता आली आहे. या विचित्र परिस्थितीचा फायदा हा सट्टेबाज उठवत आहेत. राज्य सरकारचे या प्रकाराकडे लक्ष नसल्याने ग्राहक व शेतकरी दोघेही त्यात भरडले जात आहेत.

कांदा दरात तेजी सुरू झाली असून जुना उन्हाळ कांदा हा प्रतिक्विंटल २८०० ते ३३०० रुपये तर खरीप लाल कांदा हा २१०० ते २५०० रुपये दराने विकला जात आहे. नाशिक व नगर जिल्ह्य़ांतील बाजार समित्यांच्या आवारात हा दर निघत आहे. पण सोलापूर व नगर जिल्ह्य़ातील काही बाजार समित्यामधील व्यापाऱ्यांनी २० गोणी कांद्याला चार हजार रुपये दर दिला. विक्रीसाठी आलेल्या कांद्याला सरासरी दर हा २३०० ते २५०० रुपये एवढा आहे. पण राहता, श्रीरामपूर, नगर, अकोले, पारनेर या बाजार समित्यांनी ५० ते १०० गोण्या कांद्याला ४१०० रुपये दर दिला आहे. त्याच्या बातम्या देऊन आवक वाढविण्यासाठी खटाटोप केला आहे. दिखाऊ कृत्रिम तेजीचा लाभ व्यापारी व बाजार समित्या उठवत आहेत.

उद्योग कशासाठी केला जातो?

बाजार समित्यांना कांदा विक्रीवर एक रुपये टक्क्यांनी कर मिळतो. एक क्विंटल कांद्यामागे ३० रुपये कर मिळतो. आता तेजीत आवक वाढली तर उत्पन्न वाढते. तर सध्या व्यापाऱ्यांना आवक वाढल्याने जादा नफा कमविता येतो. सध्या ग्राहक जास्त आहे, परप्रांतात मागणी वाढली आहे. त्यामुळे कांद्याची पळवा-पळवी करण्याचा प्रयत्न काही व्यापारी करत आहेत. नगर जिल्ह्य़ात राहुरी, घोडेगाव येथे आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगण, तामिळनाडू राज्यातील व्यापारी माल खरेदीसाठी येतात. पण अन्य समित्यात अडते कांदा खरेदी करून तो अन्य राज्यात पाठवितात. राहुरी, घोडेगावला येणारा कांदा वळविण्यासाठी अशी चालुगिरी केली जात आहे.

परिणाम काय?

कृत्रिम तेजीने माध्यमामध्ये बातम्या येऊन सरकार दर नियंत्रण करते. निर्यातबंदी करून आयात केली जाते. खुल्या बाजारात किरकोळ विक्रीचा दर भरमसाट वाढविला जातो. शेतकऱ्यांना सध्या सरासरी २५०० रुपये दर मिळत आहे. मुंबई व पुण्याच्या ग्राहकांना ३० ते ४० रुपये दराने कांदा विकत मिळाला पाहिजे पण तो ५० ते ७० रुपये दराने विकला जातो. मध्यस्थाची साखळी मालामाल होते. ज्या व्यापाऱ्याकडे साठा आहे त्यांची चांदी होते. शेतकऱ्यांना तेजी-मंदीचा लाभ मिळत नाही. गेली दोन वष्रे शेतकऱ्यांना कांद्याला ६०० ते ७०० रुपये दर मिळाला. उत्पादन खर्च हा ७०० ते ८०० रुपये येतो. दोन वष्रे झालेला तोटा भरून काढण्याची संधी आली पण ती गमावण्याची पाळी येते.

राहुरीकडून कारवाई

राहुरी बाजार समितीने मात्र कृत्रिम तेजी निर्माण करणाऱ्या अनिष्ट प्रथेला लगाम घातला आहे. असे बोगस दर काढणाऱ्यावर कारवाई केली जाते. बाजार समिती जे दर प्रसिद्धीला देते त्यात किती गोण्या कांद्याला किती दर मिळाला हे सविस्तर विवरण दिलेले असते. अन्य समित्या तसे दर जाहीर करत नाहीत.

तेजी हळूहळू येते..

कांद्याला बाजारात हळूहळू तेजी येते. एका दिवसात हजार रुपये दराने भाववाढ होत नाही. दररोज १०० ते २०० रुपयाने दर वाढले तर त्याला तेजी म्हणता येईल. पण काही ठिकाणी अनिष्ट प्रथा सुरू झाल्या आहेत. शेतकऱ्यांना सर्व समजते. आवक वाढविण्यासाठी अल्प मालाला दर वाढवून दिल्याने व्यापार अस्थिर होतो. यात शेतकरी व सामान्य ग्राहकांचे नुकसान होते. देशातील मोठय़ा बाजार समित्या, मोठे व्यापारी यांचे दर हे मागणी व पुरवठय़ावर ठरतात. कांद्याला नोव्हेंबपर्यंत तेजी राहील.

सुरेश बाफना, कांदा व्यापारी व दराचे विश्लेषक

व्यापारी व समित्यांवर कारवाई करा

कांदा दरात बनवेगिरी कारणांवर पणन संचालकांनी कारवाई केली पाहिजे. किती गोण्या कांद्याला किती दर मिळाला हे जाहीर करावे, बोगस दर प्रसिद्ध करू नये. कृत्रिम तेजी निर्माण करणारे शेतकऱ्यांचे शत्रू आहेत. त्यामुळे सरकार भाव पाडते. नियंत्रण आणते. तेजीचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा म्हणून खरे दर जाहीर करावे. यापुढे कांदा दर पणन मंडळाने जाहीर करावे

सुरेश ताके, ज्येष्ठ कार्यकत्रे, स्वाभिमानी शेतकरी संघटना.