वन विभागाचे स्पष्टीकरण; पर्यावरण प्रेमींचा विरोध कायम
महाबळेश्वर येथील ‘पोलोग्राऊंड’ परिसराचा कुठलाही विस्तार नाही, तर सध्या केवळ मदानाचा विकास करण्यात येणार असल्याचा खुलासा वन विभागाच्या वतीने आज येथे करण्यात आला. विस्ताराच्या पातळीवर एक पाऊल मागे येणाऱ्या वन विभागाने जंगलात मध्यभागी अशा प्रकारचे खेळ घेतल्याने मानवी वर्दळीमुळे तेथे होणाऱ्या निसर्गाच्या हानीबाबत मात्र मौन राखल्याचे मत पर्यावरण प्रेमींमधून व्यक्त होत आहे.
महाबळेश्वर येथील या मैदानावर लवकरच पोलोचे सामने भरवले जाणार असून त्यासाठी या मैदानाचा विकास आणि विस्ताराची वनविभागाची योजना होती. यामुळे भोवतीच्या निसर्गाला धोका असल्याचे वृत्त दै. ‘लोकसत्ता’मध्ये रविवारी (दि. ७) प्रसिद्ध झाले. या वृत्ताने सर्वत्र खळबळ उडाली. शासनस्तरावर याची दखल घेऊन तातडीने अधिकाऱ्यांची बैठक घेऊन याबाबतचा खुलासा करण्यात आला. या मैदानालगत असलेल्या दाट जंगलाला कुठलाही धक्का न लावता ‘पोलो’चे खेळ खेळण्याची योजना असल्याचे सांगण्यात आले. या साठी विस्ताराची योजना सध्या तरी विचाराधीन नसून, आहे त्या मैदानावरच हे सामने खेळवले जातील, असे विभागाच्या वतीने साताऱ्याचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांनी सांगितले. दरम्यान, वनविभागाच्या या खुलाशावर पर्यावरण प्रेमींमधून काही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. या मैदानाच्या विस्ताराची योजना वन विभागाने मागे घेतली असली तरी निसर्गाच्या ऐन गाभ्यात अशा प्रकारचे खेळ खेळवल्यामुळे तिथे होणाऱ्या मानवी हस्तक्षेपाचा निसर्गाला मोठय़ा प्रमाणात त्रास होण्याचा धोका व्यक्त केला आहे. या खेळामुळे या परिसरात होणारी वर्दळ, त्यांना पुरविल्या जाणाऱ्या सुविधा या साऱ्यांचा इथल्या निसर्गावर ताण निर्माण होणार असल्याचे रानवाटा संस्थेच्या अध्यक्षा सीमंतिनी नूलकर यांनी सांगितले. तर, वनविभागाने आपण निसर्गाचे विश्वस्त आहोत या नात्याने या प्रश्नाकडे पाहात त्याला प्राधान्य द्यावे असे मत पर्यावरण अभ्यासक डॉ. संदीप श्रोत्री यांनी व्यक्त केले. दरम्यान, राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगुंटीवर यांनी या प्रश्नाची तातडीने दखल घेत उद्या (दि. ९) बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीस या भागातील लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.