घरांची तोडफोड, वाहने पेटवली

आंतरजातीय प्रेमप्रकरणातून झालेल्या खुनाचा सूड म्हणून साताऱ्याजवळील चिंचणेर वंदन गावातील दलित वस्तीवर मंगळवारी रात्री जमावाने भीषण हल्ला केला. या हल्ल्यात या वस्तीवरील पन्नासहून अधिक घरांचे नुकसान झाले असून घरातील साहित्याची मोडतोड आणि वाहनांना आगीही लावण्यात आल्या आहेत. पोलिसांनी तातडीने हालचाल करत याप्रकरणी ३१ जणांना अटक केली असून त्यांच्याविरुद्ध दलित अत्याचार प्रतिबंधक कायदानुसार (अ‍ॅट्रॉसिटी) गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ आज साताऱ्यात बंद पाळण्यात आला. परिसरात मोठा तणाव निर्माण झाला असल्याने या गावात तसेच सातारा शहरात पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे.

चिंचणेर गावातील सिध्दार्थ ऊर्फ बारक्या दणाणे याने बारामती येथील अरुणा मोहिते हिचा ३० नोव्हेंबर रोजी खून केला होता. हा खून प्रेमप्रकरणातून झाला होता. याबाबत कालच दणाणे याला अटक करण्यात आल्यावर सर्वत्र संतापाचे वातावरण होते. या पाश्र्वभूमीवर सुडातून हा हल्ला करण्यात आला आहे.

मंगळावारी रात्री साडेदहाच्या सुमारास परिसरातील दीडशेहून अधिक जणांच्या संतप्त जमावाने या वस्तीवर हल्ला केला. हल्ल्यापूर्वी जमावाने या वस्तीचा वीजपुरवठा खंडित केला. अंधारातच वस्तीवरील प्रत्येक घर फोडण्यात आले. घरातील दूरचित्रवाणी संच, कपाट, काचेचे सामान, संगणक, तसेच संसारोपयोगी वस्तूंची तोडफोड करण्यात आली. दारापुढील वाहने पेटवून देण्यात आली. या हल्ल्याने घाबरलेल्या वस्तीवरील नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतल्याने ते बचावले. या संतप्त जमावाकडून तब्बल एक तास अंधारात हा धिंगाणा सुरू होता. हल्ल्याची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी धावले. पण तोवर हा जमाव घटनास्थळाहून पसार झालेला होता. पोलिसांनी लगोलग तपास करत आज दुपापर्यंत यातील ३१ जणांना अटक करत त्यांच्याविरुद्ध ‘अ‍ॅट्रॉसिटी’ कायदानुसार गुन्हे दाखल केले आहेत.

दरम्यान या घटनेचे वृत्त पसरताच आज लगोलग त्याचे पडसाद उमटले. दलित कार्यकर्त्यांकडून पुणे-कोल्हापूर महामार्ग रोखण्यात आला. शहरातील बाजार बंद करण्यात आले. रिपब्लिकन पक्षातर्फे शहरात बंदचे आवाहन करण्यात आल्यावर शहरातील सर्वच व्यवहार ठप्प झाले. शाळा, महाविद्यालये सोडून देण्यात आली. घटनेचा निषेध करण्यासाठी दुपारी सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला.