सोलापूर महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी काँग्रेसकडून प्रा. सुशीला आबुटे, तर राष्ट्रवादीकडून उपमहापौरपदासाठी प्रवीण डोंगरे यांची उमेदवारी मंगळवारी अधिकृतपणे दाखल करण्यात आली. विरोधात भाजपच्या नरसूबाई गदवालकर व शिवसेनेच्या अनिता चव्हाण यांनी अनुक्रमे महापौर व उपमहापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. येत्या ६ सप्टेंबर रोजी महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक होणार आहे.
आगामी अडीच वर्षांसाठी महापौरपद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव आहे. त्यासाठी सत्ताधारी काँग्रेसकडून प्रा. सुशीला आबुटे यांच्यासह श्रीदेवी फुलारे व अनिता म्हेत्रे यांनी मोर्चेबांधणी केली असता यात प्रा. आबुटे यांना संधी देण्यात आली. उपमहापौरपद मित्रपक्ष राष्ट्रवादीकडे असून त्यासाठी प्रवीण डोंगरे यांची ज्येष्ठता विचारात घेऊन त्यांना संधी देण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतला.
गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेवर काँग्रेसचे नेते विष्णुपंत कोठे यांचे वर्चस्व होते. परंतु त्यांचे पुत्र, माजी महापौर महेश कोठे यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधात बंड करीत काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला आहे. विशेषत: आगामी विधानसभा निवडणुकीत महेश कोठे हे सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात उभे राहण्याची तयारी चालविली आहे. शिंदे यांना धक्का देण्याच्या हेतूने महापालिकेत सत्तांतर घडविण्याचाही प्रयत्न महेश कोठे यांनी चालविला आहे.
या पार्श्र्वभूमीवर सत्ताधारी काँग्रेसमध्ये सावधगिरी बाळगून महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीत पक्षश्रेष्ठींनी ठरविलेल्या उमेदवारांनाच मतदान करण्यासाठी पक्षाच्या सर्व नगरसेवकांना व्हिप बजावला आहे. कोणत्याही परिस्थितीत पक्षाला दगाफटका होणार नाही, याची पुरेपूर दक्षता घेण्यात येत असल्याचे पक्षाचे शहराध्यक्ष प्रकाश यलगुलवार यांनी सांगितले. तर दुसरीकडे शिवसेनेत प्रवेश केलेले महेश कोठे यांच्या हालचालींकडे सर्वाचे लक्ष वेधले आहे.
राष्ट्रवादीकडून उपमहापौरपदासाठी प्रवीण डोंगरे यांच्यासह बिस्मिल्ला शिकलगार यांच्यासह अनिता जाधव यांनी प्रयत्न चालविले होते. प्रवीण डोंगरे यांचे पारडे जड झाल्याचे दिसून येताच पक्षाचे शहराध्यक्ष महेश गादेकर यांनी महिलेला संधी मिळावी म्हणून प्रस्ताव आणला होता. परंतु यात अखेर डोंगरे यांनी बाजी मारली. गेल्या तीन खेपांपासून महापालिकेवर निवडून येणारे डोंगरे हे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील गटाचे समजले जातात. त्यांच्या गळय़ात उपमहापौरपदाची माळ पडण्यासाठी खासदार मोहिते-पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सोलापुरात येऊन पक्षाच्या बहुसंख्य नगरसेवकांची बैठक घेतली होती.
सुवर्ण महोत्सव साजरा करीत असलेल्या सोलापूर महापालिकेत एकूण १०२ नगरसेवकांपैकी सत्ताधारी काँग्रेसचे ४४, तर मित्रपक्ष राष्ट्रवादीचे १६ नगरसेवक आहेत. भाजपचे २५, शिवसेनेचे ९, माकपचे ३, बसपाचे ३, रिपाइं व अपक्ष-प्रत्येकी १ याप्रमाणे नगरसेवकांचे बलाबल आहे. सत्ताधारी काँग्रेसमध्ये कोठे गटाला मानणाऱ्या नगरसेवकांची संख्या १५ इतकी आहे. त्यामुळे महापौरपदाच्या निवडणुकीत कोठे गटाकडून काँग्रेसला धक्का देत चमत्कार घडविला जाणार का, याची उत्कंठा राजकीय वर्तुळात आहे.