केंद्र सरकारमधील मंत्र्यांचे घोटाळे व महाराष्ट्रातील सरकारला दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना करण्यात आलेले अपयश याबद्दल नागरिकांमध्ये जनजागृती घडवण्यासाठी काँग्रेस राज्यभर ‘हल्लाबोल’ आंदोलन करणार आहे. नगर जिल्हय़ातील या आंदोलनाची सुरुवात सोमवारी (दि. ३१) कर्जतमधून केली जाणार आहे. जिल्हाभर मेळावे घेऊन, जनावरांसह मोर्चे काढून आंदोलन केले जाणार आहे. उद्या, शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेऊन जिल्हय़ात दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचे शिष्टमंडळ भेटणार आहे.
विरोधी पक्षनेता राधाकृष्ण विखे यांनी ही माहिती पत्रकारांना दिली. याच संदर्भात विखे यांच्या उपस्थितीत नगरमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. ललित मोदी प्रकरणात केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज व राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे तसेच व्यापमं गैरव्यवहारप्रकरणी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान या भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घातले. याला उत्तर न देता पंतप्रधानांनी संसदेकडे पाठ फिरवली, त्यामुळे संसदेचे कामकाज झाले नाही. परंतु त्याचे खापर काँग्रेसवर फोडण्यासाठी सत्ताधारीच आंदोलन करू लागले आहेत. याबद्दल जनजागृती केली जाणार असल्याचे विखे यांनी सांगितले.
राज्य सरकार दुष्काळी परिस्थितीबाबत गंभीर नाही. राज्यात दुष्काळामुळे दर तीन तासाला एक याप्रमाणे शेतकरी आत्महत्या करू लागला आहे. तरीही सरकार उपाययोजना करण्यास तयार नाही. त्यामुळे झोपी गेलेल्या सरकारला जागे करण्यासाठी आंदोलन होणार आहे. सरकारने विनंती केल्यास सर्व राजकीय पक्ष एकत्र येऊन दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना करण्यास सरकारला मदत करण्यास तयार आहे, असेही विखे यांनी सांगितले. पक्षाचे आ. भाऊसाहेब कांबळे, जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे, जि.प. उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, सभापती बाबासाहेब दिघे, सदस्य बाळासाहेब हराळ, बाळासाहेब गिरमकर, हेमंत ओगले तसेच पदाधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री प्रभावहीन!
प्रशासन पालकमंत्र्यांचेही ऐकेनासे झाले आहे. मंत्र्यांमध्ये आपसात तसेच सत्तेतील भाजप-सेना या दोन्ही पक्षांत ताळमेळ राहिलेला नाही, अशी टीका करून विरोधी पक्षनेता विखे यांनी त्यामुळे टंचाई निवारणासाठी मुख्यमंत्र्यांनी जिल्हानिहाय आढावा बैठका घ्याव्यात, अशी मागणी केली. राज्यातील विशिष्ट जिल्हय़ातच दुष्काळ आहे, असे मानून सरकार तेथेच उपाय करण्याचे सरकारचे धोरण चुकीचे आहे. सरकारने अन्य जिल्हय़ांतील शेतकऱ्यांनाही दिलासा देण्याची भूमिका घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.