अशोक सहकारी साखर कारखान्याच्या दि. १ एप्रिल २०१३ ते ३१ मार्च २०१४ या कालावधीतील कारभाराची चौकशी करण्याचे आदेश प्रादेशिक साखर सहसंचालक एम. डी. भालेराव यांनी दिले असून तपासणी पथकाची नेमणूक केली आहे.
प्रादेशिक साखर उपसंचालक आर. एस. खंडाईत, विशेष लेखापरीक्षक पी. ए. मोहळकर व बी. के. आगळे यांच्या पथकाने कारभाराची तपासणी करून १५ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र भोसले, सुरेश ताके, प्रताप पटारे, राम पटारे, भरत आसने, गोिवद वाबळे, ईश्वर दरंदले, ज्ञानदेव थोरात, रंजन नवले, भास्कर थोरात आदींनी केलेल्या गैरव्यवहाराच्या तक्रारीवरून ही चौकशी केली जाणार आहे.
अशोक कारखान्याची गाळपक्षमता २ हजार ६०० टन प्रतिदिन असून ३ हजार ५०० ते ३ हजार ८०० टन गाळप होऊ शकते, पण सहवीजनिर्मितीसाठी जास्त दिवस गाळप सुरू ठेवल्याने शेतकऱ्यांचा ऊस १६ महिने शेतात राहतो त्यामुळे वजनात घट येते. कारखान्याचा ऊस उत्पादन खर्च १ हजार ६९७ रुपये ४६ पैसे असून अन्य कारखान्यांपेक्षा तो ४०० रुपयांनी जास्त आहे. रेक्टिफाईड स्पिरीटचा उत्पादन खर्च २५ रुपये ९५ पैसे तर इथेनॉलचा खर्च ३४ रुपये ९१ पैसे आहे. स्पिरीटची विक्री किंमत २९ रुपये १६ पैसे असून अन्य कारखान्यांच्या तुलनेत उत्पादन खर्च ६ रुपयांनी जास्त तर विक्री किंमतही ४ रुपयांनी कमी आहे. सहवीजनिर्मिती प्रकल्पाचा खर्च प्रतिमेगावॉट २ कोटीने जास्त झाला आहे. वीजनिर्मिती करण्याऐवजी भुसा बाहेरच्या कारखान्यांना विकला असता तर जास्त पैसे मिळाले असते. अबकारी कराचे कर्ज मिळाले, पण अहवालात त्याचा उल्लेख नाही. अशी तक्रार स्वाभिमानीने केली होती. त्याची दखल घेत सहसंचालक भालेराव यांनी चौकशीचे आदेश दिले.