पालिकेची करामत; खासदार निधीचा गैरवापर

एरवी दहा लाख रुपयांमध्ये दीडशे ते दोनशे मीटर रस्त्याचे काम करणारी उस्मानाबाद नगरपालिका आता केवळ ६० मीटरवर येऊन थांबली आहे. दहा लाख रुपयांत फक्त ६० मीटर रस्त्याची निविदा मंजूर करण्याची करामत पालिकेने केली आहे. खासदार निधीचा होत असलेला गरवापर यानिमित्ताने चव्हाटय़ावर आला आहे. विशेष म्हणजे साठ मीटरचे काम सलग न करता ‘मेरे घर के सामने’ असे म्हणत ठेकेदारांनी स्वत:च्या दारासमोर ३० मीटरच्या दोन तुकडय़ात काम पूर्ण करण्याचा घाट घातला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच उत्कृष्ट पालिका म्हणून ४ कोटी रुपयांचा पुरस्कार देऊन उस्मानाबाद पालिकेचा गौरव केला. तोवर खासदार निधीतून ठेकेदारांच्या दारातील रस्ता पूर्ण करण्यासाठी पालिका प्रशासनाने सुरू केलेला आततायीपणा समोर आला आहे. प्रभाग क्रमांक पाचमधील चौक परिसरात उल्हास गपाट ते प्रदीप मुंडे यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याला पालिकेने परवानगी दिली आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कार्यारंभ आदेश देखील देण्यात आले. त्यामुळे कामाच्या नावाप्रमाणे हे पूर्ण काम होणे अपेक्षित असताना दहा लाख रुपयांमध्ये पालिका अभियंत्याला हाताशी केवळ साठ मीटर अंतराचेच काम उरकण्याचे प्रस्तावित आहे. तेदेखील सलग काम न करता उल्हास गपाट यांच्या घरासमोर ३० आणि मुंडे यांच्या घरासमोर ३० मीटर काम करण्याचे ठरले आहे.

पालिकेने यापूर्वी शहरात दहा लाख रुपयांमध्ये दीडशे ते दोनशे मीटर लांबीचे अनेक रस्ते तयार केले आहेत. मात्र याच ठिकाणी त्याला बगल देऊन केवळ साठ मीटर कामाचा घाट घातला जात आहे. भविष्यात दहा लाख रुपयांच्या निधीत अधिकाधिक नागरिकांना दिलासा मिळावा याकरिता पूर्वीप्रमाणे काम केले जाणार की, ठेकेदारांचे उखळ पांढरे करण्यासाठी खासदार निधीचा असाच गरवापर होणार का, असा प्रश्न प्रभाग क्रमांक पाचचे नगरसेवक अभिजित काकडे यांनी उपस्थित केला आहे. सभागृहात या कामाला आपण विरोध करूनही त्याला मंजुरी दिली असल्याचा आरोपही त्यांनी केला. याबाबत नगर अभियंता दत्तात्रय कवडे यांच्याशी संपर्क साधला असता सलग काम होणे अपेक्षित आहे. मात्र ज्यांनी खासदार निधी आणला आहे ते त्यांच्या सोयीनुसार काम करतात. त्याचे अंदाजपत्रक आणि अंमलबजावणी पालिकेकडे असल्याचे सांगत कवडे यांनी हात वर केले. दहा लाख रुपयांमध्ये केवळ सिमेंट रस्ता नव्हे, तर दोन्ही बाजूला गटारदेखील प्रस्तावित आहे. त्याचबरोबर या ठिकाणी खासदार निधीतून उर्वरित रस्त्याचे कामदेखील केले जाणार आहे. त्यामुळे दोन ठिकाणी ३० मीटरच्या तुकडय़ांमध्ये रस्ता केला जाणार असल्याची माहिती कंत्राटदार प्रदीप मुंडे यांनी सांगितले.