तुम्ही गुजरातला दौरा केल्यास गुजरात विकासात आघाडी घेत असल्याचे प्रत्यक्ष पाहिल्यास महाराष्ट्र व तुमचा जिल्हा कोठे हे कळेल असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना खडे बोल सुनावले. कोकणचा आवाज खेडच्या सभेत घुमविणार असे त्यांनी स्पष्ट केले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कुडाळ येथे मनसेच्या तालुकानिहाय पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांना भेट दिली. त्यांनी आपण कोकणचे प्रश्न खेडच्या सभेत बोलणार आहे. त्यामुळे आता पत्रकारांशी बोलणार नसल्याचे सांगत वार्तालाप केला.
तुम्ही गुजरातला जाऊन या, नंतर महाराष्ट्र व तुम्ही कोठे आहात हे कळेल असे त्यांनी महाराष्ट्राच्या धोरणाबाबत बोलताना स्पष्ट केले. संघटनेची पुनर्बाधणी करण्यात येणार आहे. त्यासाठी ही प्राथमिक फेरी असून, येत्या दीड महिन्यात संघटना बांधणी पूर्ण होईल असे राज ठाकरे म्हणाले. गोवा राज्याने प्रवेश कराचा निर्णय घेतला तर त्यात वावगे काय? महाराष्ट्रात ठिकठिकाणी टोल नाकी आहेतच, त्यामुळे त्यावर काय बोलणार असे सांगून माधव गाडगीळ पर्यावरणीय अहवालावर खेडच्या सभेत बोलणार आहे, असे सांगत परप्रांतीयांविरोधात कायमच आघाडी उघडली आहे त्याही बाबतीत खेडच्या सभेत भूमिका उघड होईल असे राज ठाकरे म्हणाले.
परप्रांतीयांचे लोंढे थांबले पाहिजेत. आज राज्य शासनाने भाषिक भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. हिंदी व उर्दू भाषिक वाढल्याने राज्य सरकार विविध ठिकाणी तशाच परीक्षा घेणार त्याला मी एकटय़ाने विरोध करून चालणार नाही. त्यासाठी सर्वानीच बोलले पाहिजे असे राज ठाकरे म्हणाले.
कोकणच्या जमिनी विकणारे दलाल आपलेच आहेत व जमीनही विकणारे आपलेच, त्यामुळे बोलायचे कोणाला? असा परप्रांतीय प्रश्नावर बोलताना राज यांनी भूमिका मांडली. खेडच्या सभेत सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आदी भागांतील प्रश्नावर बोलणार असे ते म्हणाले.