सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात अवकाळी पावसामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. सव्‍‌र्हेक्षणानुसार दोन हजार ३०० हेक्टर भातपीक नापीक बनले आहे. मात्र जिल्हाधिकारी यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिलेले नसल्याने नेमकी नुकसानी आणि भातशेती लागवड क्षेत्र उघड झालेले नाही.
या हंगामात उशिरा पाऊस सुरू झाला. या लहरी हवामानामुळे भरडी शेती करता आली नाही तर भात लागवडीखाली सात हजार ५४५ हेक्टर क्षेत्र आले. या हंगामात भातशेती लागवडीच्या क्षेत्रात घटच झाली.
भात लागवड करण्यात आली. त्यातील कापणीलायक भात झाले असताना किंवा भात कापणी करून ठेवले असताना सतत ढगफुटी झाल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला. भातकापणी करून ठेवले असताना पावसामुळे कुजले तसेच भाताला कोंबही आले.
जिल्ह्य़ात दोन हजार ३०० हेक्टर भातपीक अवकाळी पावसाच्या कचाटय़ात सापडले असल्याचा अंदाज कृषी विभागाचा आहे. भातपीक जमिनीलाच भिडले असतानाच ते कुजलेही, पण त्याचे पंचनामे करण्याचे आदेश अद्याप झाले नाहीत.
जिल्हाधिकारी यांना नवनिर्वाचित आमदारांनी पत्रे देऊन भातशेतीचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी केली, पण जिल्हाधिकारी यांच्याकडून पंचनामे करण्याच्या आदेशाची वाट कृषी विभाग पाहत आहे. राष्ट्रपती राजवटीमुळे अधिकार मिळूनही शेतकऱ्यांसाठी त्याचा वापर झाला नाही, असे सांगण्यात आले.