चनाखा कोर्टा बंधाऱ्यामुळे भलेमोठे प्रश्नचिन्ह

महाराष्ट्र आणि तेलंगण यांच्यात झालेल्या सामंजस्य करारात यवतमाळ जिल्ह्य़ातील पनगंगा नदीवर होणाऱ्या चनाखा कोर्टा बंधाऱ्यांचा समावेश असल्यामुळे गेल्या वीस वर्षांपासून सतत वादाच्या भोवऱ्यात गटांगळ्या खात असलेल्या निम्न पनगंगा प्रकल्पाचे स्वप्न कधीतरी पूर्ण होईल की नाही, ही शंका दृढ होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

महाराष्ट्रातील प्राणहिता, गोदावरी व पनगंगा या नद्यांवरील तुमडीहेटी, मेडीगट्टा आणि चनाखा कोर्टा असे तीन बंधारे बांधण्यासाठी महाराष्ट्र आणि तेलंगण यांच्यात मंगळवारी सामंजस्य करार झाला. या करारात यवतमाळ जिल्ह्य़ातील पनगंगा नदीवर चनाखा कोर्टा बंधारा बांधण्यात येणार असून, शून्य टक्के क्षेत्र बुडीत होणार आहे आणि शंभर टक्के खर्चसुध्दा तेलंगण सरकारच करणार आहे. बंधाऱ्याची उंची २१३ मीटर राहणार असून, महाराष्ट्राला ०.३ टीमसी, तर तेलंगणला १.२ टीमसी पाणी मिळणार आहे.

जिल्ह्य़ातील चनाखा रुढा, कोदुरी, पिंपळखुटी व बोरी या पाच गावांतील १२१४ हेक्टर क्षेत्रास लाभ मिळेल. चनाखा व कोर्टा गावांना जोडणारा मार्ग बांधण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केल्याने जिल्ह्य़ातील निम्न पनगंगा प्रकल्प आता जवळजवळ बुडीतच निघणार की काय अशी चर्चा होत आहे.

चनाखा कोर्टा या ठिकाणी बंधारा बांधण्याचे काम तेलंगण सरकारने सुरू केले आहे. निम्न पनगंगा धरण झाले असते तर यवतमाळ, चंद्रपूर व अदिलाबाद जिल्ह्य़ांतील जवळपास अडीच लाख हेक्टर जमीन ओलिताखाली आली असती. धरणातील ८८ टक्के पाणी महाराष्ट्राला आणि १२ टक्के पाणी तेलंगणला मिळाले असते. पण, गेल्या २० वषार्ंपासून हा प्रकल्प रखडला आहे. महाराष्ट्र व तेलंगणमध्ये झालेल्या सामंजस्य करारामुळे निम्न पनगंगाचे स्वप्न साकार होणे शक्य नसल्याचीच सार्वत्रिक प्रतिक्रिया आहे.

विधिमंडळाचे नागपुरात होणारे एकही हिवाळी अधिवेशन पनगंगा प्रकल्पाच्या प्रश्नाशिवाय पार पडलेले नाही. या आंतरराज्यीय सिंचन प्रकल्पाच्या पूर्णत्वास २५ वष्रे लागणार असे जलसंपदा विभागाने मुंबई उच्च न्यायालयाच्या  नागपूर खंडपीठाच्या न्या. भूषण गवई व न्या. विनय देशपांडे यांच्यासमोर शपथपत्रातून स्पष्ट केले.

पुतळ्यांना दुधाचा अभिषेक

महाराष्ट्र आणि तेलंगण यांच्यात सामंजस्य करार होताच तेलंगणात जल्लोष साजरा करीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या पुतळय़ांचा दुधाने अभिषेक करण्यात आला. या वेळी फटाक्यांची आतषबाजी करीत हैदराबाद विमानतळावर ‘केसीआर’ यांचे स्वागत करीत रॅली काढण्यात आली. गोदावरी नदीवर तुमडीहेटी, मेडिगट्टा आणि चनाखा या तीन बंधाऱ्यांची कामे लवकर सुरू होणार आहेत. तेलंगणातील प्रत्येक जिल्हय़ात दिव्यांची रोषणाई करण्यात आली होती. राव यांचे हैदराबाद विमानतळावर आगमन होताच लाखो लोकांनी त्यांचे स्वागत केले. महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात या तिन्ही बंधाऱ्यांबाबत लोकांमध्ये प्रचंड नाराजीची भावना आहे. या प्रकल्पामुळे सिरोंचा तालुक्यातील २१ गावे बुडणार आहेत.

तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आपल्या शेतकऱ्यांसाठी ज्या तळमळीने प्रकल्प राबवत आहे ती तळमळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखवत नाहीत व प्रकल्प रखडत ठेवतात, यासारखे दुर्दैव नाही

शिवाजीराव मोघे, माजी मंत्री