सातारा जिल्ह्यातील पांढरवाडी येथे अभिनेता सयाजी शिंदे यांनी लावलेल्या शेकडो झाडांची कत्तल केल्याप्रकरणी अप्पा मदने या संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. तो पांढरवाडी येथेच राहणार असून रस्त्याच्या दुतर्फा लावलेली ही झाडे माझ्या मालकीच्या जमिनीत मला न विचारता लावल्यामुळे मी या झाडांवर कुऱ्हाड चालवल्याचे त्याने सांगितल्याचे पोलिसांनी म्हटले. पण या कृत्यामागे आणखी काही हेतू होता का याचाही पोलीस तपास करत असल्याचे वृत्त एबीपी माझा या वृत्त वाहिनीने दिले आहे.

साताऱ्यातील माण व खटाव येथील दुष्काळी भागात सयाजी शिंदे यांनी सुमारे २५ हजार झाडे लावली होती. त्यांना ग्रामस्थांकडूनही याबाबत चांगला प्रतिसाद मिळाला होता. पावसाळ्यात ही झाडे लावण्यात आली होती. सहा महिन्यांपासून पाणी देऊन या झाडांना पाणी देऊन जगवले होते. या परिसरातील शालेय विद्यार्थी झाडे वाचवण्यासाठी मोठी मेहनत घेत होते. सयाजी शिंदे यांनीही या झाडांना पाणी घालून नवीन वर्षाचे स्वागत केले होते. परंतु सोमवारी या झाडांची कत्तल झाल्याचे समोर आले होते.
पांढरवाडी गावाला जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा जवळपास १०० हून अधिक झाडांवर अज्ञाताने कुऱ्हाडीचे घाव घालून ती तोडल्याचे समोर आले होते. दरम्यान तपासात दिरंगाई होत असल्यामुळे साताऱ्यामधील काही ग्रामस्थांनी मुंबई येथील आझाद मैदानावर निदर्शने केली हाती.