मराठवाडय़ात मंत्रिमंडळाची स्वतंत्र बठक होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आग्रह धरेन, असे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी येथे पत्रकार बठकीत सांगितले. पक्ष संघटनेतून व राज्य सरकारमध्ये गोपीनाथ मुंडे यांना मिळत होती, तशीच सन्मानाची वागणूक मिळत असल्याचेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. पक्षाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडून महापालिका निवडणुकीत पंकजा मुंडे समर्थक कार्यकर्त्यांना डावलले गेले. या पाश्र्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पक्षाकडूनही चांगली वागणूक मिळत असल्याचा खुलासा त्यांनी केला.
कोअर कमिटीत स्थान देऊन पक्षाने माझा पूर्वीच सन्मान केला. पक्षात सर्व स्तरावर गोपीनाथरावांची जागा दिली जात असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या. मराठवाडय़ाच्या विकासासाठी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या काळात विशेष बठका होत असत. ती परंपरा खंडित झाल्यानंतर विभागवार बठका घेतल्या गेल्या पाहिजेत, असा भाजप कार्यकर्त्यांचा आग्रह असे. या विषयी नवीन सरकारमध्ये काही चर्चा झाली काय किंवा ही बठक सुरू होणार काय, असे विचारले असता या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांशी एकदा चर्चा झाली आहे. आता पुन्हा एखादी कॅबिनेट मराठवाडय़ासाठी व्हावी, असा आग्रह करेन. त्यांनी वेळ दिला, तर लवकरच हा निर्णय होईल, असे मुंडे यांनी सांगितले. मात्र, अविकसित भागात अधिक लक्ष देण्याची भूमिका आहे, असेही त्या म्हणाल्या.
महिला व बालविकास विभागामार्फत सुरू असणाऱ्या बालकाश्रमांचा निधी गेल्या वर्षांपासून थकला आहे. या क्षेत्रात सरकारच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या बालकाश्रमांची संख्या सुमारे ९८ असेल. मात्र, सेवाभावी संस्थांना सहायक अनुदान देण्याची पद्धत होती. अनेक संस्थांमध्ये मुलांवरच पसे खर्च होतात का, याची खात्री करण्यासाठी पुन्हा एकदा पटपडताळणीचे आदेश दिले आहेत. त्याचा दर्जाही ठरविला जाणार असून त्यानंतर अनुदान देऊ, असेही त्या म्हणाल्या. ‘अच्छे दिन’च्या प्रश्नावर पी हळद आणि हो गोरी असे होत नसते. काँग्रेस सरकारला पोखरायला एवढे दिवस दिले. आता ते सुधारण्यासाठी काही दिवस लागतील, असेही त्या म्हणाल्या. जलयुक्त शिवार योजनेचा अधिक लाभ होईल व पारदर्शक काम होईल, असेही त्यांनी सांगितले.