भाजपच्या आमदार पंकजा मुंडे यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याचे दूरचित्रवाहिन्यांवरून दिसताच जिल्हाभर कार्यकर्त्यांनी फटाके व तोफा वाजवून आनंदोत्सव साजरा केला. मात्र, या आनंदाला गोपीनाथ मुंडे यांच्या निधनामुळे झालेल्या दु:खाचीही किनार होती. तब्बल १५ वर्षांनंतर जिल्हय़ास सत्तेत चांगले स्थान मिळाले.
पंकजा मुंडे यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी चच्रेत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात पहिल्या दहा कॅबिनेट मंत्र्यांमध्ये पंकजा मुंडे यांनीही शपथ घेतली. शपथविधीसाठी कार्यकत्रे मोठय़ा संख्येने दोन दिवसांपासूनच मुंबईस रवाना झाले होते. वानखेडे स्टेडियमवर पंकजा मुंडे यांचे नाव जाहीर होताच मोठी घोषणाबाजी झाली. हे दृश्य दूरचित्रवाहिन्यांवर दिसताच कार्यकर्त्यांनी चौकाचौकांत फटाके फोडून, तोफांचे बार उडवून जल्लोष केला. शहरात भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी रॅली काढून आनंदोत्सव साजरा केला.
परळीसह जिल्हय़ाच्या बहुतांश शहरात हा उत्सव सुरू होता, मात्र या आनंदाला गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाच्या दु:खाची किनार होती. चारच महिन्यांपूर्वी नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात ग्रामविकासमंत्रिपदी मुंडे यांनी शपथ घेतली होती. मात्र, आठ दिवसांत त्यांचे निधन झाले, अन्यथा मुख्यमंत्री म्हणून मुंडे यांचे नाव पुढे आले असते, ही भावना कार्यकर्त्यांनी या निमित्ताने व्यक्त केली. अवघ्या चार महिन्यांत केंद्रीयमंत्री म्हणून गोपीनाथ मुंडे यांनी, तर राज्यात पंकजा मुंडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्याचे चित्र लोकांनी पाहिले.

‘मी पंकजा गोपीनाथ मुंडे’..!
पंकजा मुंडे शपथ घेण्यास उभ्या राहिल्या. ‘मी पंकजा गोपीनाथ मुंडे’.. असे म्हणत शपथ घेण्यास सुरुवात करताच दूरचित्रवाहिनीसमोर बसलेल्या अनेकांचे डोळे गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणीने पाणावले. पंकजा यांना मंत्रिपद मिळाल्याचे समाधान असले, तरी ४० वर्षांच्या संघर्षांनंतर मुंडे केंद्रात मंत्री झाले. मात्र, त्यांच्या अचानक निधनामुळे दु:ख झाल्याची भावना भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष फुलचंद कराड यांनी व्यक्त केली.