‘पुन्हा संघर्ष यात्रा’ काढताना किती प्रतिसाद मिळेल, या विषयी शंका होत्या. मात्र, एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे की, त्यानंतर केंद्रात राजकारण करायचे की राज्यात, असा निर्माण झालेला संभ्रम काही अंशी कमी झाला आहे. यात्रेच्या पहिल्या टप्प्याच्या समारोपानंतर राज्याच्या राजकारणातच राहावे, असा कल निर्माण झाल्याचे भाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा आमदार पंकजा मुंडे यांनी येथे सांगितले. संघर्ष यात्रेनिमित्त आयोजित पत्रकार बैठकीत त्या बोलत होत्या. यात्रेचे प्रमुख सुजीतसिंह ठाकूर यांची उपस्थिती होती.
गोपीनाथ मुंडे कधीही मुख्यमंत्रिपदाचे दावेदार नव्हते. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरविण्यासाठी मात्र ते आग्रही होते. त्यांचे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी या यात्रेचाही खारीचा वाटा असेल, असे सांगत यात्रेस पक्षातूनही पाठिंबा मिळत असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या. मात्र, यात्रेच्या पहिल्या टप्प्यात प्रदेश स्तरावरील नेते सहभागी झाले नव्हते, हे त्यांनी मान्य केले. एकनाथ खडसे यांनी त्यांची सून रक्षा खडसे यांना पाठविले होते. कोअर कमिटीची सदस्य म्हणून जेवढा सन्मान देणे आवश्यक, तेवढा तो दिला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या यात्रेच्या पाठीशी दिवंगत नेते मुंडे यांची पुण्याई आहे. त्यांची संघर्ष यात्रा त्यांच्या जिवावर होती. मात्र, या यात्रेला त्यांच्या पुण्याईचा आधार आहे. त्यामुळेच मोठा प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले. औरंगाबाद शहरातील जयभवानीनगर येथे आयोजित सभेला मोठी गर्दी होती. यात्रेदरम्यान गोपीनाथ मुंडे यांच्यासमवेत सतत असणारे पाशा पटेल यांची गैरहजेरी कशामुळे, असे विचारले असता त्या म्हणाल्या की, मुंडे यांच्यासमवेत काम करणारे सर्वजण माझ्यासाठी ज्येष्ठ आहेत. पाशा पटेल यात्रेच्या निमित्ताने आपणास भेटून गेले. माझी काम करण्याची पद्धत मुंडेसाहेबांपेक्षाही वेगळी असू शकते. यात्रेत माझी ‘टीम’ काम करते आहे. बीड जिल्ह्य़ात पाशा पटेल यांना काम करावे लागणार आहे. सर्व ज्येष्ठांचे आशीर्वाद आहेतच, असेही त्या आवर्जून म्हणाल्या.
यात्रा काढण्यापूर्वी आणि पहिला टप्पा पार करताना मानसिकतेत फरक पडला असल्याचेही त्यांनी सांगितले. उदंड प्रतिसाद मिळत असल्याचे सांगत या यात्रेच्या समारोपाला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची उपस्थिती असेल, अशी माहितीही त्यांनी दिली.