बळीराजाचे राज्य आणायचे हा माझा संकल्प आहे. तो तडीस नेण्यासाठी शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात मी देईन, त्या उमेदवाराला विजयी करा असे आवाहन आमदार पंकजा मुंडे-पालवे यांनी बुधवारी पाथर्डी येथे केले. गोपीनाथ मुंडे यांचा वारसा सांगताना तब्बल पाच तास विलंबाने त्या येथील जाहीर सभेला पोहोचल्या.
पंकजा मुंडे-पालवे यांची संघर्ष यात्रा बुधवारी पाथर्डी येथे पोहोचली. या वेळी झालेल्या जाहीर सभेत त्या बोलत होत्या. ही सभा दुपारी १२ वाजता होणार होती. तेव्हापासून लोक जमले होते. पंकजा मुंडे-पालवे या पाच तास विलंबाने म्हणजे तब्बल सायंकाळी येथे आल्या. मात्र तोपर्यंत लोकांची गर्दी थांबून होती. हे विशेष. खासदार दिलीप गांधी, आमदार बबनराव पाचपुते, आमदार शिवाजी कर्डिले, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस सूरजितसिंग ठाकूर, माजी आमदार दगडू पाटील बढे, अशोक गर्जे, सी. डी. फकीर, शिवाजी काकडे आदी या वेळी उपस्थित होते. येथून त्या पुढे शेवगावला गेल्या.
पंकजा मुंडे-पालवे म्हणाल्या, सावकाराच्या जाचातून शेतकरी-शेतमजूर यांची सुटका करू अशा वल्गना काँग्रेस आघाडीने केल्या. प्रत्यक्षात त्यांनी शेतकरी-शेतमजुरांनाच सोलले. त्यांना पायउतार करून बळीराजाचे राज्य आणण्यासाठी मी देईन तो उमेदवार विजयी करा. आम्हाला परळीपेक्षाही अधिक प्रेम पाथर्डीने दिले. मुंडे यांची ताकद व विचार जिवंत ठेवण्यासाठीच राज्यात संघर्ष यात्रा काढली. ऊसतोडणी मजुरांच्या कोयत्याची धार मुंडे होते. या मजुरांचा सध्या संप सुरू आहे. या लवादावर मुंडे यांच्याऐवजी मला घ्यावे, अशी विनंती संघटनेने साखर संघाला वारंवार केली. मात्र त्याला साखर संघाचा विरोध आहे. उद्याच (गुरुवारी) या संघटनांची बैठक बोलावण्यात आली असली तरी, माझ्या संमतीशिवाय हा संप मिटणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. राज्याचा मुख्यमंत्री होण्यापेक्षा या लवादावर जाण्यात मला अधिक रस आहे, असेही त्या म्हणाल्या.
ऊसतोडणी कामगारांसाठी मुंडे यांनी घरकुलांचे स्वप्न पाहिले होते, ते आपण प्राधान्याने पूर्ण करू अशी ग्वाही पंकजा मुंडे-पालवे यांनी दिली. भगवानगडाचे पितृछत्र आणि मुंडे यांची पुण्याई याच्या बळावर राज्यात बळीराजाचे राज्य आणू असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला. ऊसतोडणी मजूर दरिद्री असला तरी तोच माझा नारायण आहे, असे त्या म्हणाल्या.
माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष मृत्युंजय गर्जे, सोमनाथ खेडकर, पं. स. सदस्य भगवान आव्हाड, संजय बडे आदींनी या वेळी भाजपत प्रवेश केला.