नियतीशी लढा देण्यासाठी, लोकनेता होण्यासाठी ही संघर्ष यात्रा आहे. लाल दिव्याची गाडी घेण्यासाठी आणि मंत्रिपद घेण्यासाठी ही संघर्ष यात्रा नसून मस्ती चढलेल्या सरकारला खाली खेचण्यासाठी ही संघर्ष यात्रा आहे, असे प्रतिपादन भाजपाच्या नेत्या पंकजा पालवे-मुंडे यांनी केले.
    सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी नायगाव (ता खंडाळा) येथील जाहीर सभेत त्या बोलत होत्या. यावेळी भीमराव तापकीर, दिलीप येळगावकर, डी एम बावळेकर, सदाशिव सपकाळ, मकरंद देशपांडे आदी उपस्थित होते. यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम जाधव यांनी भाजपात प्रवेश केला.
     या सरकारने खूप मोठे घोटाळे केले आहेत. या सरकारला धडा शिकविण्यासाठी व सत्तेची मस्ती घालविण्यासाठी मी लढा देणार आहे. सामान्य माणूस नरेंद्र मोदी आज पंतप्रधान झाले आहेत. आता सर्वसामान्यांचे दिवस आले आहेत. सावित्रीबाई फुलेंच्या कार्याला वंदन करून मी हे काम हाती घेतले आहे. नियतीशी मी लढा देणार आहे. गोपीनाथ मुंडे यांनी सर्वसामान्य कुटुबांतून येऊन प्रस्थापितांना सत्तेतून घालविण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. माझे वडील गेल्यानंतर सामान्य माणसानी मला ताकद दिली म्हणून मी लढणार आहे. नुसते लोकसेवक बोर्ड लावून लोकनेता होता येत नाही. लोकांमध्ये मिसळून त्याची सुख-दु:खे समजून घेतल्याशिवाय लोकनेता होता येत नाही. म्हणून माझा हा संघर्ष आहे. यांना वाटते सत्ता आणि पशाशिवाय प्रगती करता येत नाही. देशात आणि राज्यात प्रगतीसाठी एकच सरकार आणायचे आहे. या सरकारला धडा शिकविण्यासाठी माझा लढा आहे. ही क्रांतिज्योत आता पेटल्याशिवाय राहणार नाही. काहीही झाले तरी आपल्याला हे सरकार घालवायचे आहे, असेही त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. जिल्हाध्यक्ष भरत पाटील यांनी प्रास्ताविक केले.