परभणी लोकसभा मतदारसंघात चुरशीच्या वातावरणात पार पडलेल्या निवडणुकीत शिवसेनेचे संजय जाधव, राष्ट्रवादीचे विजय भांबळे यांच्यासह १७ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. कडक बंदोबस्तामुळे जिल्ह्यात कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. सायंकाळी सहापर्यंत सरासरी ६२ टक्के मतदान झाले. शेवटच्या तासात मतदानाचा वेग वाढला. सायंकाळी पाचपर्यंत ५५ टक्के मतदान झाले. पालम तालुक्यातील सायळा येथील ग्रामस्थांनी रस्त्याच्या मागणीसाठी मतदानावरील बहिष्कार कायम ठेवला. या गावात एक हजारपकी सायंकाळी पाचच्या सुमारास केवळ दोघांनी मतदान केले.
एकूण १ हजार ३४२ केंद्रांवर मतदानाची व्यवस्था केली होती. ६९ संवेदनशील केंद्रांवर बंदोबस्त वाढविला होता. जिल्ह्यात ७ आयपीएस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली बंदोबस्त तनात होता. मतदान केंद्रांवर कर्मचारी व प्रत्येक उमेदवाराच्या दोन प्रतिनिधींशिवाय मतदारांनाच प्रवेश असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. सायंकाळी पाचपर्यंत १० लाख ६७ हजार ४६ मतदारांनी मतदान केले होते. परभणीतील नूतन विद्यामंदिर, परभणी तालुक्यातील मालेवाडी व गंगाखेड येथील केंद्रावर सुरुवातीलाच मशिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने तेथील मशिन बदलण्यात आल्या. मतदार यादीत नाव नसल्याच्या तीन तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाल्या. मागील निवडणुकीत ८ लाख ७० हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, मतदानाची टक्केवारी ५३.९ टक्के होती. या वेळच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी लक्षणीय वाढली. मतदारांना मतदानाच्या हक्कासंबंधी जागृत करण्यासंदर्भात वेगवेगळ्या मोहिमा राबविण्यात आल्या. त्याचाही चांगला परिणाम दिसून आला.
जिंतूर विधानसभा मतदारसंघाची टक्केवारी सुरुवातीपासून लक्षणीय राहिली. येथील संवेदनशील मतदान केंद्रास अतिरिक्त पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी भेट दिली. जिंतूरखालोखाल परभणी विधानसभा मतदारसंघात मोठे मतदान झाले. प्रमुख उमेदवार भांबळे व जाधव यांच्या जिंतूर व परभणी या प्रभावक्षेत्रात मतदानाचा टक्का वाढला.
उन्हाची तीव्रता अधिक असल्याने प्रत्येक केंद्रावर मतदारांना रांगेत उभे राहण्यासाठी सावलीची व्यवस्था केली होती. प्रत्येक केंद्रावर प्राथमिक औषधोपचाराची साधनेही उपलब्ध केली होती. काही विशेष केंद्रांवर तज्ज्ञ डॉक्टरांचीही उपस्थिती होती. दुपारी एक ते चार दरम्यान मतदानाचा वेग काहीसा मंदावला. तापमान ४० अंशाच्या आसपास असल्याने तीव्र उन्हाचा परिणामही मतदानावर झाला. दुपारी चारनंतर पुढील दोन तासांत मतदान आणखी वाढले. दोन्ही बाजूंनी शेवटच्या दोन तासांत जास्तीत जास्त मतदान घडवून आणण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करण्यात आली.