इसिस या दहशतवादी संघटनेच्‍या संपर्कात असल्याच्या संशयावरुन परभणीतून अटक करण्यात आलेल्या शाहीद खानला २९ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. एटीएसने परभणीतून शाहीद खान नावाच्या तरुणाला रविवारी १ किलो स्फोटकांसह ताब्यात घेतले होते. यापूर्वी इसिसशी संबंध असल्याच्या संशयावरून शनिवारी रिझवान खानला कल्याणमधून अटक करण्यात आले होते. मराठवाड्यातील तरुण मोठ्या प्रमाणात दहशतवादी होण्यासाठी इसिसच्या संपर्कात असल्याची माहिती एटीएसला मिळाली होती. त्यानंतर आठ दिवसांपासून दहशतवाद विरोधी पथकातील अधिकारी परभणी शहरात पाळत ठेवून होते. काही दिवसांपूर्वी एटीएसने परभणीतून नासेरबिन चाऊसला अटक केली होती. तो इसिसच्या संपर्कात असल्याचा संशय होता. नासेरबिन चाऊसच्या चौकशीतून शाहीद खानचे नाव समोर आल्याने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे.