परभणी महानगरपालिकेसाठी चौरंगी लढत अपेक्षित

महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष खडबडून जागे झाले असून शहरातल्या वेगवेगळ्या प्रभागांमध्ये सर्वच राजकीय पक्षांतले इच्छुक उमेदवार कामाला लागले आहेत. गेल्या पाच वर्षांत सत्तास्थानी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसपुढे महापालिका निवडणुकीत आपले वर्चस्व टिकविण्याचे आव्हान असून राष्ट्रवादीसह काँग्रेस, शिवसेना, भारतीय जनता पक्ष हे चारही प्रमुख पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्यासाठी उतरणार आहेत.

पाच वर्षांपूर्वी महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने प्रताप देशमुख यांना महापौरपदाचे उमेदवार म्हणून पुढे केले होते. त्याआधी नगराध्यक्ष म्हणून केलेली विकास कामे आणि सर्वमान्य प्रतिमा या जोरावर राष्ट्रवादीने त्यांचा चेहरा निवडणुकीत पुढे केला होता. अपेक्षेप्रमाणे निवडणुकीत ३० जागा जिंकून राष्ट्रवादीने पहिले स्थान पटकावले. त्या वेळी काँग्रेसला दूर ठेवत राष्ट्रवादीने महापालिकेत सत्तास्थापन केली. अडीच वर्षांनंतर महापौरपद मागास प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित झाल्यानंतर राष्ट्रवादीच्याच संगीता वडकर यांना महापौरपदाची संधी लाभली. या वेळी मात्र राष्ट्रवादीसोबत काँग्रेसचा ‘हात’ होता. काँग्रेसचे भगवान वाघमारे हे उपमहापौर झाले. पाचही वर्षे राष्ट्रवादीकडे महापालिकेचे महापौरपद राहिले. तर उत्तरार्धात काँग्रेसला सत्तेत भागीदारी मिळाली. आता पुन्हा निवडणुकीच्या निमित्ताने हे दोन्ही पक्ष आपल्या चुली स्वतंत्रपणे मांडणार आहेत.

सध्या परभणी शहर महानरगपालिका निवडणुकीसाठी एकूण १६ प्रभाग असून निवडून द्यावयाच्या नगरसेवकांची संख्या ६५ आहे. आधीच्या रचनेत ३३ प्रभाग होते. आता प्रभागांची संख्या घटली आहे. १६ प्रभागांपकी पंधराव्या प्रभागातून पाच नगरसेवक निवडून द्यावयाचे आहेत. तर उर्वरित सर्व प्रभागांमधील प्रत्येकी चार नगरसेवक निवडून येणार आहेत. प्रभागांची व्याप्ती वाढल्याने आरक्षण जाहीर झाल्यानंतर लगेच सर्व इच्छुक कामाला लागले. आपल्या प्रभागातल्या आरक्षणानुसार या ‘भावी’ चेहऱ्यांनी आपापले चार-चार जणांचे गटही तयार केले. आता पक्षाकडे उमेदवारी मागताना एकटय़ादुकटय़ाने न जाता चौघांच्या गटानेच जाण्याची नवीन पद्धत सुरू झाली आहे. चारही प्रमुख राजकीय पक्ष स्वतंत्रपणे निवडणुकीत उतरणार असल्याने इच्छुकांची संख्या वाढली तरीही सर्व प्रभागांत मिळून ६५ उमेदवार देण्याची एकाही पक्षाची क्षमता नाही. शहरातील मतदारांची संख्या २ लाख १२ हजार ८८८ एवढी आहे.

वरपुडकरांची रणनीती

मावळत्या महापालिकेतले पक्षीय बलाबल असे आहे. राष्ट्रवादी ३०, काँग्रेस २३, शिवसेना ८, भाजप २, अपक्ष २. आता महापालिका ताब्यात घेण्यासाठी राजकीय पक्षांनी प्रभागानुसार प्रभावी चेहऱ्यांचा शोध सुरू केला आहे. महानगरपालिकेत पाच वष्रे सत्तास्थानी असलेल्या राष्ट्रवादीला आपली सत्ता अबाधित ठेवण्याचे मोठे आव्हान आहे. जेव्हा पाच वर्षांपूर्वी महापालिकेची निवडणूक होती तेव्हा सुरेश वरपुडकर हे राष्ट्रवादीचे नेते होते. आता वरपुडकरांनी पक्षांतर करूनही बराच काळ लोटला आहे. सध्या काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असलेले वरपुडकर राष्ट्रवादीच्या जागा घटविण्यासाठी व्यूहरचना आखत आहेत. गेल्या निवडणुकीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या काँग्रेसला प्रथमस्थानी आणण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

परभणी हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. विधानसभा, लोकसभा निवडणुकीत शिवसेना दणदणीत यश संपादन करते. मात्र परभणी शहरात शिवसेनेला राजकीय अवकाश फारसा मिळत नाही. गेल्या महापालिका निवडणुकीत सेनेचे केवळ आठच सदस्य निवडून आले. विधानसभेला हमखास यश मिळते पण शहरातल्या राजकारणात शिवसेना कायम दुय्यमस्थानी असते. या वेळी महापालिका निवडणुकीत राजकीय यश मिळविण्यासाठी आ. डॉ. राहुल पाटील, सहसंपर्कप्रमुख डॉ. विवेक नावंदर हे कामाला लागले आहेत. परभणीत सध्या ‘खासदार विरुद्ध आमदार’ असाही पक्षांतर्गत सुप्त संघर्ष चालू आहे. या संघर्षांचा फटका पक्षाला बसू शकतो, असे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनाही वाटू लागले आहे. दोन नेते एकत्र आले आणि एकदिलाने कामाला लागले तर पक्षाला चांगल्या जागा मिळतील असे शिवसेनेच्या सामान्य कार्यकर्त्यांलाही वाटते. मात्र सद्य:स्थितीत या ‘जर तर’ ला फारसा अर्थ नाही. विधानसभा निवडणूक स्वतंत्र लढल्यापासून भारतीय जनता पक्ष आपल्या कार्यकर्त्यांना सामावण्याच्या आणि स्वत:चे राजकीय अस्तित्व निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहेत. महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर भाजपच्या नगरसेवकांची संख्या अवघी दोन एवढीच होती. केंद्रात व राज्यात सत्ता मिळवल्यानंतर तरी परभणीत भारतीय जनता पक्षाला आपले अस्तित्व ठळक आणि ठसठशीत करता येईल काय? या प्रश्नाचे उत्तरही याच येणाऱ्या निवडणुकीत मिळणार आहे. भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांच्यावर पक्षाला राजकीय यश मिळवून देण्याची जबाबदारी आहे. शिवसेना व भारतीय जनता पक्षाचा मतदार हा एकाच विचारधारेचा असल्याने शहरातील विशिष्ट मतांच्या विभागणीचे तोटेही या दोन्ही पक्षांना बसू शकतील. शहरावर वर्चस्व कोणाचे याचा निर्णय या निवडणुकीत होणार असल्याने स्थानिक नेत्यांनी या निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. सोयीनुसार बदलणारी समीकरणे, ऐनवेळी उद्भवणारी बंडखोरी, पशाचा प्रचंड वापर या सर्वच निवडणुकांमध्ये दिसून येणाऱ्या बाबींनी आतापासूनच तोंड वर काढायला प्रारंभ केला आहे.