शालेय मुलांच्या अपहरणाचे प्रयत्न व अपहरणाच्या घटनांमुळे शहरात सध्या पालक व विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड घबराट पसरली असून, धास्तावलेले अनेक पालक आपल्या पाल्यांना सायंकाळच्या सुमारास घराबाहेर पडण्यास मज्जाव करत आहेत. परिणामी, सायंकाळचे खासगी शिकवणी वर्ग आणि विविध खेळांच्या सरावासाठी मैदानांवर जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली असून शाळांमधील उपस्थितीवरही परिणाम जाणवू लागला आहे.
शहरात काही दिवसांपासून शालेय विद्यार्थ्यांच्या अपहरणाचे प्रयत्न आणि अपहरण करण्याच्या घटना वाढल्या आहेत. शुक्रवारी सोयगाव नववसाहतीतील सुरेश महेंद्र शिंदे (१५) या विद्यार्थ्यांचे अपहरण करण्यात आल्याचा संशय आहे. याविषयी कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दहावीत असलेला महेंद्र सकाळी साडेअकरा वाजता शाळेत जाण्यासाठी घराबाहेर पडला. सायंकाळी तो घरी परतलाच नाही. पालकांनी सर्वत्र शोध घेतला, परंतु त्याचा तपास लागू शकला नाही. घराजवळील एकाने त्याला त्या दिवशी दुपारी मालेगाव-दाभाडी रस्त्यावर बघितल्याची माहिती दिली. अजून एका ओळखीच्या महिलेने त्याला सायंकाळच्या सुमारास सटाणा रस्त्यावरील आघार गावाजवळ एका रिक्षात बघितल्याची माहिती दिली. त्यामुळे महेंद्रचे अपहरण झाले असण्याचा त्याच्या पालकांना संशय आहे.
रविवारी सोयगाव भागातच राम या १२ वर्षांच्या विद्यार्थ्यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न त्याच्या प्रसंगावधानामुळे फसला. इयत्ता पाचवीतील राम हा घराजवळ खेळत असताना एकाने त्याला सायकलवरून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. रामने आरडाओरड केल्यानंतर त्या व्यक्तीने रामला सोडून धूम ठोकली. रामचे वडील श्रीकांत बच्छाव यांनी छावणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दोन दिवसांपूर्वी येथील पोलीस कवायत मैदानावर सातव्या इयत्तेतील एक विद्यार्थी हॉकीच्या सरावासाठी जात असता त्यालाही एकाने  पकडण्याचा प्रयत्न केला. आठवडय़ापूर्वी कॅम्प भागात काही जणांनी एका विद्यार्थ्यांचे अपहरण करण्याचा असाच प्रयत्न केला होता. त्या वेळी परिसरातील जागरूक नागरिकांनी वेळीच प्रसंगावधान दाखवल्याने अपहरण करू पाहणाऱ्यांचा प्रयत्न फसला होता.