लोकसभा लढविणार की विधानसभा, या बाबत अजून निर्णय घेतला नाही. परंतु केंद्रात गेले तरी राज्याच्या राजकारणात सक्रिय राहून जनतेची सेवा करणार आहे, असे भाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा आमदार पंकजा मुंडे यांनी सांगितले. मुंडे कुटुंबीयांच्या विरोधात लोकसभेला राष्ट्रवादीचा उमेदवार दिला जाणार नाही, या शरद पवार यांच्या भावनेचा आदरच करते, असेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली ‘सिंदखेड राजा ते चौंडी’ अशी संघर्षयात्रा गुरुवारी निघाली. सकाळी महात्मा फुले विद्यालयात पंकजा मुंडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी गुन्हेगारांच्या विरोधात १९९४ मध्ये संघर्षयात्रा काढून १९९५ मध्ये राज्यात काँग्रेसचे सरकार उलथवून टाकले. आताच्या यात्रेतून सत्ताबदलाचे काम होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राज्यातील आघाडी सरकार घालवून महायुतीची सत्ता आणण्याचे मुंडे साहेबांचे स्वप्न होते. ते पूर्ण करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यामुळे या संघर्षयात्रेचा सत्ताबदलासाठी निश्चित उपयोग होईल. आघाडी सरकारच्या कारभारावर जनता वैतागली आहे. औद्योगिकरण, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आदी कारणांमुळे सरकारविरोधात जनतेचा रोष आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
इतर पक्षांतून नेते-कार्यकर्त्यांना प्रवेश देताना भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाईल. ज्या मतदारसंघात गेल्या ३-४ निवडणुकांपासून भाजपला विजय मिळवता आला नाही अशाच ठिकाणी बाहेरच्या लोकांना पक्षात प्रवेश दिला जात आहे, असेही पंकजा यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. भाजप-सेनेची पूर्वीचीच युती आहे. परंतु गोपीनाथ मुंडे यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम व रिपाइं या पक्षांची मोट बांधून महायुती घडवून आणली. महायुतीचे खरे जनक मुंडेच आहेत, असे त्यांनी सांगितले.
  मुंडे यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी चालू असून, या बाबतचे काम योग्य पद्धतीने चालले आहे. या घटनेचे कोणीही राजकीय भांडवल करू नये, याचा पुनरुच्चारही पंकजा यांनी केला. सुरजितसिंह ठाकूर, खासदार संजय जाधव, भाजप सरचिटणीस विजय गव्हाणे, जिल्हाध्यक्ष विठ्ठल रबदडे, गणेशराव रोकडे, अभय चाटे, श्यामसुंदर मुंडे आदी उपस्थित होते.
उमेदवारीवर डोळा ठेवून स्वागतानिमित्त पोस्टरबाजी!
वार्ताहर, िहगोली
भाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा आमदार पंकजा मुंडे यांची संघर्षयात्रा उद्या (शनिवारी) िहगोलीत येणार आहे. मात्र, संघर्षयात्रेच्या स्वागताचे निमित्त साधून, परंतु विधानसभेच्या उमेदवारीवर डोळा ठेवून पक्ष कार्यकर्त्यांत जोरदार पोस्टरबाजी सुरू आहे.
शहरातील प्रत्येक वीजखांब, ऑटोरिक्षा, जीप आदी वाहनांना यात्रेच्या स्वागतानिमित्त पोस्टर (बॅनर) लावले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारी मिळावी, या हेतूने काहीजण भाजपत या वेळी प्रवेश करणार आहेत. पकी काँग्रेसचे मििलद यंबल यांनी यात्रेच्या स्वागतासोबतच पक्षप्रवेशाला प्रसिद्धी मिळावी, म्हणून शहरात शेकडो पोस्टर लावले आहेत. भाजपचे दुसरे दावेदार मनोज जैन यांनीही तोडीस तोड पोस्टर वीजखांब, तसेच मोक्याच्या ठिकाणी लावले आहेत.