राजकीय पक्षांचे सुनसान कार्यालय, निवडणूक निर्णय अधिकारी अर्ज स्वीकारण्यास तयार, यंत्रणा सज्ज. पण ना ढोल, ना ताशे. जाहीर प्रचारासाठी ना कोणी मैदाने आपल्या पक्षासाठी राखीव केली ना पोस्टर, टोप्या, बॅनर बनविणारे सरसावले. झाली का आघाडी आणि होते का युती, या प्रश्नांचा भोवताल पितृपक्षात अडकल्याने मंगळवारचा दिवस सुनासुनाच गेल्याचे चित्र होते.
शहरातील शिवसेना कार्यालयासमोर सुरक्षारक्षक नेहमीप्रमाणे उभा. काही जण टीव्ही पाहत उभे. काँग्रेसचे कार्यालय तर दुपारी बारापर्यंत उघडलेच नव्हते. तिकडे दिवसभर फिरकण्यास काही कारण नसल्याने कोणी आले नाही की गेले नाही. भाजप कार्यालयात वर्दळ अशी नाहीच. दोघे-चौघे नेहमीचेच. राष्ट्रवादीचे कार्यालय एवढे दूर की दररोज तेथे जायचे तर कशासाठी, असा प्रश्न असतो. साहजिकच तिकडेही कोणी फिरकले नाही.
वर काही ठरत नाही. उमेदवार कोण माहीत नाही. त्यामुळे राजकीय गोटात कमालीची अस्वस्थता आहे. निवडणूक कार्यालयातही फारशी वर्दळ नाही. केवळ अर्ज विक्री होत आहे. आतापर्यंत केवळ पाच उमदेवारांनी अर्ज दाखल केले. औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक २३ व्यक्तींनी ३५ अर्ज नेले आहेत. गंगापूर मतदारसंघातून भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राम बाहेती यांनी अर्ज दाखल केला. ९ मतदारसंघांत केवळ ५ जणांनी पितृपक्षाला झुगारून दिले. उद्याही अशीच स्थिती राहील, असे सांगितले जात आहे.