प्रदेशाध्यक्ष चव्हाण आज उमरखेडमध्ये
विधानसभा निवडणुकीत पानिपत झालेल्या जिल्ह्य़ात काँग्रेसला पूर्ववैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी मुंबईत खास बठक घेऊन तरुण नेत्यांच्या हाती सत्ता देण्याच्या निर्णय घेतला असला आणि सूक्ष्म नियोजन केले असले तरी येथील जिल्हा कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाच्या वाद काही त्यांना सोडवता आला नाही. ते रविवारी उमरखेडला येत आहेत. यावेळी हा वाद मिटवून कुणालाही करा, पण अध्यक्ष करा, असा आग्रह पक्ष कार्यकत्रे धरणार आहेत. राज्यात अलीकडेच बारा जिल्हाध्यक्ष बदलले. मात्र, येथील अंतर्गत कलहामुळे हा वाद मिटता मिटत नाही, असे चित्र आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पुरता सफाया होऊन एकही उमेदवार निवडून आलेला नाही. अशा स्थितीत पक्ष बळकटीकरणासाठी जिल्हाध्यक्षांची निवड होणे गरजेचे आहे. त्यासाठी खासदार चव्हाण यांना लक्ष देण्याची विनंती केली जात आहे. राज्यात काँग्रेस सत्ताविहीन झाल्यानंतर कांॅग्रेसला सत्तारूढ सेना-भाजप युती सरकारला विरोध करण्याच्या अगणित संधी असतांनाही निपचत पडलेल्या जिल्हा काँग्रेसला ऊब द्यायची असेल तर जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून माजी आमदारांना बदलवून अन्य कुणाची वर्णी लावावी, यावरून काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाटय़ावर आली आहे. या रस्सीखेचीत माजी मंत्री संजय देशमुख यांच्या नावाला दिसून येत असलेल्या अनुकुल वातावरणाने गणराज्य दिनाच्या दिवशीच्या ध्वजारोहणानंतर जिल्हा कॉंग्रेस कार्यालयात काँग्रेस नेत्यांमध्ये झालेली जोरदार खडाजंगी, हा चच्रेचा विषय झाला आहे. विद्यमान अध्यक्ष वामनराव कासावार संयमी आणि हजरजबाबीपणा व विनोदबुध्दीसाठी ख्यात असूनही अध्यक्ष बदलाच्या चच्रेत सिंहाचा वाटा घेत असलेल्या माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांच्यावर त्यांनी टीकेची झोड उठवली. अध्यक्षाला कार्यकारिणी जाहीर करू दिली जात नाही आणि त्यांचा राजीनामाही स्वीकृत होत नाही, अशा स्थितीत आपल्याला दोष देत दिल्लीश्वरांच्याजवळ नव्या अध्यक्षांसाठी फिल्डिंग लावत असल्याचा कासावारांचा मोघे यांच्यावर आरोप असल्याची चर्चा होती. कुणालाही अध्यक्ष करा, पण लवकर करा, असा मोघे यांचा आग्रह असला तरी कोणत्याही एका नावावर पक्षात एकमत होत नाही. माजी मंत्री प्रा. वसंत पुरके यांना माणिकराव ठाकरे गटांचा विरोध आहे. कारण, पुरके हे दिवंगत माजी खासदार उत्तमराव पाटील गटाचे आहेत. माजी मंत्री संजय देशमुख यांनी पक्षबदलाचा केलेला प्रवास लक्षात घेता त्यांच्या पक्षनिष्ठेवर संशय व्यक्त होत आहे. जि.प. उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर हे दर्डा गटाचे समजले जातात. प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष अशोक बोबडे हे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे गटाचे असूनही ठाकरेंचा त्यांच्यावरील विश्वास धुसर झाला आहे. माजी जि.प.अध्यक्ष व महिला राष्ट्रीय कॉग्रेसच्या पदाधिकारी संध्या सव्वालाखे यांचे पक्ष आणि समाजासाठी योगदानच कोणते, असा प्रश्न केला जातो. अध्यक्षपदाची धुरा सांभाळणारी व्यक्ती सर्वाना घेऊन चालणारी, आíथकदृष्टय़ा संपन्न, अनुभवी आणि निष्ठावंत असावी, अशा व्यक्तीचा शोध घेता घेता पक्षश्रेष्ठींच्या नाकीनऊ येत असल्याचेही चित्र आहे.