कंधारचे माजी आमदार प्रताप पाटील चिखलीकर व त्यांचे समर्थक नांदेड लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला ‘ताप’ देण्यास सज्ज झाले असतानाच काँग्रेस उमेदवार अशोक चव्हाण यांनी गुरुवारी त्यांच्याकडे सहकार्याचा ‘हात’ मागितला. या वेळी उभयतांत अखेर दिलजमाई झाली. माजी मंत्री विनायक पाटील यांनी या कामी महत्त्वाची भूमिका बजावली.
चिखलीकरांचा लोहा-कंधार मतदारसंघ लातूर लोकसभेला जोडला असून, बुधवारी तेथे लातूरमधील काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित सभेत चिखलीकरांनी या उमेदवाराला पूर्ण साथ देण्याची ग्वाही दिली होती. पण याच बैठकीतून नांदेडच्या काँग्रेस उमेदवाराला ‘ताप’ देण्याचा त्यांचा इरादा समोर आला. या पाश्र्वभूमीवर त्यांचे मित्र, विनायकराव पाटील यांनी समन्वयकाची भूमिका घेत अशोक चव्हाण व प्रतापराव एकत्र आले पाहिजेत, असे मत व्यक्त केले.
लोहा तालुक्यातील सोनखेड, तसेच कंधार तालुक्यातील दोन जिल्हा परिषद गट नांदेड लोकसभेत असून तेथे चिखलीकरांचा चांगला प्रभाव आहे. चव्हाण व त्यांचे मतभेद लक्षात घेता काही भागांत काँग्रेसला फटका बसून भाजपला आयता लाभ मिळण्याची चर्चा सुरू झाली. या पाश्र्वभूमीवर चव्हाण गुरुवारी सकाळीच चिखलीकर यांच्या निवासस्थानी गेले. विनायकराव पाटील, आमदार ओमप्रकाश पोकर्णा, नामदेवराव केशवेही तेथे आले. या सर्वाची चर्चा झाल्यानंतर नांदेड मतदारसंघातही आघाडी धर्म पाळण्याची ग्वाही चिखलीकर यांनी दिली.
चिखलीकरांचे वडील गोविंदराव शंकरराव चव्हाण यांचे अत्यंत निकटचे सहकारी म्हणून ओळखले जात. राजकीय संबंधातून दोन परिवारांत दीर्घकाळ कौटुंबिक स्नेह होता, पण २००७पासून अशोकराव व प्रतापराव यांच्यातील वितुष्ट वाढत गेले. दीड वर्षांपूर्वी चिखलीकर ‘राष्ट्रवादी’त गेल्यानंतर चव्हाणांनी लोहा पालिका निवडणुकीत त्यांचा धुव्वा उडवला. तेव्हापासून दोघांत मोठे अंतर निर्माण झाले.
लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असताना चव्हाण यांनी ‘डॅमेज कंट्रोल’ मोहीम सुरू केली. आधी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यापाठोपाठ गोरठेकरांचे मित्र असलेल्या प्रतापरावांचीही भेट घेऊन चर्चा केली. गोविंदराव चिखलीकरांचा आशीर्वाद घेतला. या भेटीमुळे भाजपचे डी. बी. पाटील यांचे ‘कमळ’ कोमेजल्याची प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागली आहे. अशोक चव्हाण व प्रतापराव साईभक्त म्हणून ओळखले जातात. गुरुवारच्या मुहूर्तावर चिखलीकरांच्या ‘साईसुभाष’ बंगल्यात या साईभक्तांची दिलजमाई झाल्यानंतर चव्हाणांच्या प्रचारार्थ दुपारी झालेल्या शरद पवार व पृथ्वीराज चव्हाण यांच्या सभेला चिखलीकर व्यासपीठावर होते.