महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवेच्या माध्यमातून राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जागतिक कर्करोग दिनाचे औचित्य साधून दि. ४ ते ११ फेब्रुवारी २०१६ या कालावधीत कर्करोग सप्ताह जिल्ह्य़ातील आरोग्य संस्थामध्ये साजरा करण्यात आला. नुकतेच जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग येथे कर्करोग रुग्णांच्याकरिता कर्करोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन कर्करोगग्रस्त व कर्करोग मुक्तरुग्णांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. या वेळी प्रभारी जिल्हा चिकित्सक डॉ. अपर्णा गावकर, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. माने, डॉ. पाटील, डॉ. मानेकर व डॉ. करंबळकर, फिजिशियन डॉ. पाटणकर व डॉ. पवार, दंतशल्य चिकित्सक डॉ. देसाई तसेच जिल्हा रुग्णालयातील सर्व संवर्गातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या सप्ताहामध्ये एकूण ६३७ रुग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये १८ संशयीत व ६ निदान झालेले रुग्ण आढळून आले.
साजरा करण्यात आलेल्या कर्करोग शिबिरामध्ये सर्वसामान्य जनतेस कर्करोगविषयक लक्षणीय माहिती व उपचारविषयक जनजागृती, पीपीटी प्रेझेंटेशनद्वारे तसेच माहितीफलक, कॅन्सर सपोर्ट टॅग व आलेल्या रुग्णांचे स्वागत रिस्ट बॅण्ड बांधून व माहिती पुस्तिका इत्यादीद्वारे आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आली.
जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग येथे दर महिन्यातील तिसऱ्या बुधवारी कर्करोग विशेषतज्ज्ञ डॉ. सूरज पवार (कोल्हापूर कॅन्सर सेंटर), कोल्हापूर यांच्या माध्यमातून कॅन्सर रुग्णांची तपासणी सेवा देतात. दि. ४ ते ११ फेब्रुवारी या सप्ताहात जिल्हा रुग्णालयातील विशेषज्ज्ञ व वैद्यकीय अधिकारी यांनी कर्करोगविषयक रुग्णांची तपासणी व उपचार यांच्याकडून देण्यात आले. या शिबिराची सांगता वैद्यकीय अधिकारी, रुग्णालयीन कर्मचारी व उपस्थित रुग्ण यांनी ‘आम्ही करू शकतो, मी करू शकतो, आपण सारे कॅन्सरवर मात करू शकतो’ या सामूहिक घोषवाक्याने केली.